बदलापूरः विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाला भाजपात प्रवेश देत आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले होते. त्यानंतर आता शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांनी चक्क भाजपच्या माजी नगरसेवकालाच गळाला लावले असून हा किसन कथोरे यांना धक्का मानला जातो. विशेष म्हणजे आमदार कथोरे यांचे निवासस्थान याच प्रभागात येते. गेल्या काही दिवसात बदलापुरात कथोरे विरूद्ध म्हात्रे वाद टोकाला पोहोचला असून एकमेकांवर शाब्दीक हल्ले करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होतो आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली, कल्याणमध्ये वृक्ष प्रदूषित रोषणाई; पालिकेच्या उद्यान विभागाकडून कारवाईचा इशारा
मुरबाड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या किसन कथोरे यांचा पाचव्यांदा विजय झाला. मात्र त्याचवेळी बदलापुर शहरात शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपचे किसन कथोरे यांच्यातील वाद टोकाला गेला. कथोरे यांच्या उमेदवारीला म्हात्रे यांनी निवडणुकीआधीच विरोध सुरू केला होता. त्यामुळे ऐन प्रचार रंगात येत असताना म्हात्रे यांनी प्रचारापासून अलिप्त राहणे पसंत केले. त्यातच आमदार कथोरे यांनी वामन म्हात्रे यांचा प्रभाव असलेल्या भागातील उपशहर प्रमुख तेजस म्हस्कर यांनाच भाजपात प्रवेश दिला. त्यामुळे शिवसेनेत संताप वाढला होता. म्हात्रे यांनी याबाबतची नाराजी थेट तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली होती. तरीही शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळत कथोरे यांचाच प्रचार करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. विधानसभा निवडणुकीनंतर हा वाद टोकाला पोहोचला. विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात आमदार किसन कथोरे यांनी वामन म्हात्रे यांच्यासह सर्व पक्षांतर्गत आणि महायुतीतील विरोधकांना थेट आव्हान दिले होते.
हेही वाचा >>> डोंबिवलीत गोळवली येथील महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर शुक्रवारी कारवाई
म्हात्रे यांनी कथोरे यांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले. त्यामुळे यांच्यात वाकयुद्ध वाढल्याचे दिसत होते. मात्र वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने आयोजीत आगरी महोत्सवात पहिल्याच दिवशी भाजपचे बदलापूर गावातील माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर मंगळवारी चतुरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. माझा प्रवेश यापूर्वीच झाला होता. आता फक्त सदिच्छा भेट घेतल्याची प्रतिक्रिया हेमंत चतुरे यांनी दिली. मी १३ वर्ष शिवसेनेचा शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होतो. मी शिवसेनेकडून निवडणुकही लढवली होती. माझी बहीण शिवसेनेची नगरसेविका होती. मध्यंतरी मी भाजपात होतो. मात्र दोन वर्षांपासून मला प्रभागात काम करताना अडचणी येत होत्या. माझी घुसमट होत होती, त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया हेमंत चतुरे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. हा प्रवेश आमदार किसन कथोरे आणि भाजपासाठी धक्का मानला जातो आहे. आमदार किसन कथोरे यांचे निवासस्थान असलेल्या परिसरातून चतुरे नगरसेवक आहेत. त्यामुळे म्हात्रे यांनी विधानसभेतील फोडाफोडीची परतफेड केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
ही तर घरवापसी शिवसेनेचा कार्यकर्ता आत शिवसेनेत आला. हा पक्षप्रवेश नाही तर घरवापसी आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे. हेमंत चतुरे शिवसैनिकच होते. त्यांचा परिवार शिवसेनेशी संबंधित आहे. त्यांच्या प्रवेशामुळे बदलापुरात शिवसेना आणखी मजबूत होईल, असेही म्हात्रे लोकसत्ताशी बोलताना म्हणाले.