ठाणे: शहराच्या मध्यवर्ती भागातील गावदेवी मैदान, घंटाळी मैदान, भगवती मैदान सारखी मोठी मैदान आहेत. परंतू , याठिकाणी ऐन उन्हाळी सुट्टीत भरविण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रदर्शनामुळे स्थानिक मुलांना खेळायला मैदाने उपलब्ध होत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन भाजपाचे माजी नगरसेवक सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना निवदेन देऊन स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

उन्हाळी सुट्टीचा हा कालावधी असून या सुट्यांमध्ये अनेकांचा कल हा मैदानी खेळ खेळण्याकडे असतो. परंतू, अलिकडे बऱ्याच ठिकाणी मैदानेच शिल्लक राहिली नसल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे मैदानी खेळ खेळायचे तरी कुठे असा प्रश्न मुलांसमोर निर्माण होतो. ठाणे शहरात स्थानक परिसर आणि नौपाडा परिसराजवळ गावदेवी, घंटाळी आणि भगवती अशी तीन मैदाने आहेत. परंतु, ही मैदाने खेळण्यासाठी उपलब्ध होत नसल्याची खंत काही मुलांनी व्यक्त केली.

या मैदानांमध्ये वारंवार काहींना काही कार्यक्रम किंवा प्रदर्शन भरविले जात असल्याचे दिसून येते. ही बाब लक्षात घेऊन भाजपाचे माजी नगरसेवक सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे यांनी गेल्या आठवड्यात स्थानिक मुलांना घेऊन ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर क्रिकेट खेळत आंदोलन केले. ही मैदाने आठ दिवसात स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मोकळी करुन दिली नाहीतर, या मुलांसोबत आयुक्तांच्या दालनात क्रिकेट खेळू असा खोचक इशारा महापालिकेला देण्यात आला होता.

दरम्यान, जोशी आणि पेंडसे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना मुलांसाठी मैदाने उपलब्ध करुन द्यावे असे विनंतीचे निवेदन दिले. यावेळी आतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि भाजपा नौपाडा मंडल चिटणीस सुशांत फाटक हे उपस्थित होते.

फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे निवेदननौाड्यातील राम मारुती रोड, गोखले रोड , स्टेशन रोड परिसरात फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सायंकाळच्यावेळी हे फेरीवाले पदपथावर दुकानाच्या बाहेर बस्तान मांडून बसलेले पाहायला मिळतात. या फेरीवाल्यांमुळे पदपथांवरुन चालणे मुश्किल होत आहे. त्यात काही बांगलादेशी फेरीवाले ही असण्याची शक्यता असल्यामुळे या सर्व फेरीवाल्यांचे आधारकार्ड तपासून त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आयुक्तांकडून निवेदनाची दखल

या दोन्ही निवेदनांची आयुक्त सौरभ राव यांनी सकारात्मक दखल घेतली. त्यांनी सुट्टीच्या दिवसात मुलांना खेळण्यासाठीच केवळ मैदाने उपलब्ध राहतील यासंबंधीचा निर्णय लवकरच घेण्याचे आश्वासन दिले. तर, फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याचे आणि त्यासाठी वाहने उपलब्ध करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.