ठाणे: दिव्यातील पाणीटंचाईला जबाबदार असणाऱ्या शिंदे गटाला पाण्यात असे बुडवा की त्यांनी पुन्हा डोक वर काढू नये, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील शाखांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सायंकाळी त्यांनी दिवा आगासन रोड परिसरातील पक्ष कार्यालयाला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी दिवा टर्निंग येथे उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, राजन विचारे हे उपस्थित होते. येथील पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले. कल्याण लोकसभेतील गद्दारांची घराणेशाही गाडण्याचा निर्धार दिवावासीयांनी करावा, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा… कल्याण लोकसभेत गद्दारांच्या घराणेशाहीला गाडा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन
दिव्यात निवडणुका आल्या की दरवर्षी दहा एमएलडी पाणी वाढवल्याच्या घोषणा होतात. पण, नागरिकांना प्रत्यक्षात पाणी मिळत नाही. २२१ कोटीची पाणी योजना झाली पण, लोकांना मुबलक पाणी मिळाले का?असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. जर दिवा वासियांना पाणी मिळत नसेल तर आता त्यांना पाण्यात बुडवा असा हल्लाबोलही त्यांनी केला. कल्याण लोकसभेत आपलाच विजय होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.