लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवी मुंबईतील माजी नगरसेवक मनोहर मढवी (एम. के.) यांना ठाणे पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केली होती. गुरुवारी त्यांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे एम. के. मढवी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबईतील ऐरोली भागात एम. के. मढवी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. शिवसेना फूटल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले आहे.एम. के. मढवी हे खासदार राजन विचारे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. कळवा येथील एका कंत्राटदाराला ऐरोली भागात खोदकाम करायचे होते. त्यासाठी मढवी यांनी कंत्राटदाराकडून दीड लाख रुपये खंडणी उकळली होती.
आणखी वाचा-उबाठाचे २०१९ मध्ये काँग्रेसीकरण झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
२७ एप्रिलला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मढवी यांना आणखी एक लाख रुपयांची खंडणी घेताना पकडले होते. या घटनेनंतर ठाकरे गटाकडून या कारवाईचा निषेध केला जात होता. ही कारवाई राजकीय सूडामुळे झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. एम. के. मढवी यांनी ठाणे न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. गुरुवारी ठाणे न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत त्यांना जामीन मंजूर केला.