ठाणे : मुंबई महापालिकेच्या घाटकोपर येथील वार्ड क्रमांक १२५ च्या माजी नगरसेविका रुपाली सुरेश आवळे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुरेश आवळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. दरम्यान, पक्ष प्रवेश करणाऱ्यांना विकास हवा असल्यामुळेच त्यांनी विकासाला साथ दिली आहे. तसेच यापुढेही आणखी प्रवेश होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदिप या निवासस्थानी परिसरात शनिवारी दुपारी माजी नगरसेविका रुपाली सुरेश आवळे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुरेश आवळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांना पक्ष प्रवेश देऊन त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – महाराष्ट्र हे गुंडाराष्ट्र झालय – जितेंद्र आव्हाड
माजी नगरसेवक सुरेश आवळे हे २०१२ मध्ये मनसेच्या तिकीटावर तर, माजी नगरसेविका रुपाली आवळे या २०१७ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. या पक्षप्रवेशाबाबत पत्रकारांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी यापुढेही आणखी प्रवेश होणार असल्याचा दावा केला. या सर्वांनी वाॅर्डातील समस्या सुटत नसल्यामुळेच आता विकासाला साथ दिली आहे. राज्य सरकाराच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून मुंबईत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. यामुळे मुंबईतील प्रदूषण कमी होण्यास मदत झाली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामे केली जात आहेत. त्यामुळेच आतापर्यंत मुंबईतील ५३ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना विकास हवा आहे, म्हणून त्यांनी विकासाला साथ दिली आहे. तसेच यापुढेही आणखी प्रवेश होणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही तर रस्त्यावर उतरुन काम करणारा मुख्यमंत्री आहे. यामुळे अनेकांनी माझ्यावर विश्वास दाखविला आहे, असेही ते म्हणाले.