मीरा भाईंदर महापालिकेतील चार माजी नगरसेवकांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. यात शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन तर काँग्रेसच्या एक नगरसेकाचा समावेश आहे. शिवसेनेचे तीन नगरसेवक भाजपा पक्षात गेल्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाला फटका बसणार आहे.
शिवसेनेच्या माजी नगरसेविका दीप्ती भट, अनिता पाटील आणि कुसुम गुप्ता यांनी तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक नरेश पाटील यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे तिन्ही माजी नगरसेवक आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात निवडून आले होते. मात्र आता हे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या गटात गेले आहेत.
मीरा भाईंदर शहरात भाजपा पक्षात रवी व्यास आणि नरेंद्र मेहता असे दोन गट निर्माण झाले आहेत. नेतृत्व मिळवण्यासाठी दोघांचा आटापिटा चालू आहे. त्यामुळे आपली ताकद वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाच्या वेळी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर आता हे सर्व नगरसेवक आता नरेंद्र मेहता गटात गेले आहेत. त्यामुळे भाजपाचे रवी व्यास आणि शिंदे गट या दोघांनाही याचा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे