कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांचा जामीन अर्ज कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी फेटाळला. माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर एक वर्षानी माजी आमदार गायकवाड यांनी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून गणपत गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळुन लावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणपत गायकवाड यांच्यावतीने वकिलातर्फे कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी गोळीबाराच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शनी पुरावे मिळाले आहेत. गायकवाड यांना जामीन देण्यात आला तर ते साक्षीदारांवर दबाव टाकून त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्त करू शकतात, असे मुद्दे प्रतिपक्षाच्या वकिलाने न्यायालयात उपस्थित केले. यावेळी गणपत गायकवाड यांच्या वकिलांतर्फे युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून माजी आमदार गणपत गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला.

महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांच्यासह एकूण सात जण आरोपी आहेत. तीन जणांना न्यायालयाने यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. गायकवाड यांच्यासह चार जण तळोजा कारागृहात आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हिललाईन पोलीस ठाण्यात द्वारली येथील जमीन वादातून माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे शिवसेनेचे तत्कालीन माजी नगरसेवक महेश गायकवाड (शिंदे शिवसेनेतून हकालपट्टी) यांच्यावर स्वताजवळील पिस्तुलमधून सहा गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी महेश यांचे सहकारीही जखमी झाले होते.

या गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. वर्षभरापासून ते तळोजा कारागृहात आहेत. या गोळीबार प्रकरणात गुन्ह्यात नोंद असलेला एक जण फरार आहे. त्यांना अटक करण्यात यावी यासाठी महेश गायकवाड पोलिसांकडे सातत्याने मागणी करत आहेत. पोलिसांना काही गंभीर, किरकोळ गुन्ह्यातील आरोपी झटपट सापडतात तर मग या गंभीर गुन्ह्यातील आरोपी का सापडत नाही, असे प्रश्न महेश गायकवाड यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत. गणपत गायकवाड हे भाजपचे माजी आमदार आहेत. त्यामुळे सत्तेचा वापर करून ते लवकरच बाहेर येतील अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र गणपत गायकवाड यांनी शिवसेनेतील एका बड्या नेत्यावर केलेल्या आरोपामुळे या नेत्याच्या आडकाठीमुळे गणपत गायकवाड यांच्या सुटकेत अडथळे येत असल्याची चर्चा आहे.