लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : कळवा-मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात काही दिवसांपुर्वीच जाहीर प्रवेश केला असतानाच, त्यापाठोपाठ काँग्रेसचे नेते, ठाणे महापालिकेचे माजी महापौर नईम खान यांनी बुधवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यानिमित्ताने आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघात अजित पवार गटाने पक्ष प्रवेशांची मालिका सुरु केल्याचे चित्र आहे.

मुंब्रा भागातील काँग्रेसचे नेते नईम खान यांनी १९९२ मध्ये ठाण्याचे महापौर पद भुषविले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. परंतु २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे ठाणे काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी खान यांना गळा लावत त्यांचा पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी हा पक्षप्रवेश झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खान यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. असे असले तरी नईम खान यांचा मुलगा मिराज खान हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक असून तो शरद पवार गटासोबत असल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-गडचिरोली : पोलीस खबरी असल्याचा संशय; नक्षल्यांकडून आदिवासी नागरिकाची हत्या…

ठाणे महापालिकेत एकूण नगरसेवकांची संख्या १३१ इतकी आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे ६७ तर, राष्ट्रवादीचे ३४ नगरसेवक निवडुण आले होते. पालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाची ओळख होती. तसेच राष्ट्रवादीच्या निवडुण आलेल्या ३४ पैकी २६ नगरसेवक कळवा-मुंब्रा भागातील होते. या भागाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे करतात. हा मतदार संघ त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अगामी विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांच्याविरोधात निवडणुक लढण्याची तयारी अजित पवार गटाकडून सुरू असून त्यासाठीच या गटाने मुंब्य्रात पक्षप्रवेशांची मालिका सुरू केल्याची चर्चा आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mayor of thane naeem khan joins ajit pawars ncp mrj