जे लोक शिवसेना मध्यवर्ती शिवसेना शाखेवर हक्क सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी शाखेसाठी आतापर्यंत काय केले आहे का. शाखेतील त्रृटी पाहून काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला का. असे प्रश्न करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेनेची मध्यवर्ति शाखा ही आमचीच असल्याचा दावा गुरुवारी येथे केला.
शिंदे समर्थकांनी गुरुवारी सकाळी नोंदणीकृत कागदपत्र हातात ठेऊन शिवसेना मध्यवर्ती शाखेचा ताबा घेतला. मोक्याची आणि मध्यवर्ती ठिकाणची जागा कामकाजासाठी हाती आल्याने शिंदे समर्थकांनी आनंद साजरा केला. माजी महापौर म्हस्के, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी शाखेत भेट दिली. शाखेत ज्या त्रृटी होत्या दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. शाखेचे आताचे देखणे रुप खा. शिंदे यांच्यामुळे आपणास पाहण्यास मिळते. मग याठिकाणी इतर लोकांना हक्क सांगण्याचा काय अधिकारी, असा प्रश्न म्हस्के यांनी केला.
हेही वाचा >>> “पंढरीनाथ साबळेचा मनसुख हिरेन होण्याची शक्यता, त्याला शोधा”; किरीट सोमय्यांची मागणी
खा. शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहप्रमुख राजेश मोरे यांनी शाखेत बसूनच आतापर्यंत कामे केली. मोरे, लांडगे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात दाखल झाले आहेत. शाखेचे पाणी, मालमत्ता देयक आम्हीच भरत होतो. शाखेसंबंधी नाव दाखलच्या ज्या कायदेशीर प्रक्रिया करायच्या होत्या त्या आम्ही पूर्ण केल्या आहेत, असे म्हस्के म्हणाले.
निवडणूक काळात डोंबिवलीत ठाण मांडून असतो. अनेक वर्षांनी डोंबिवलीत आलो आहे. येथल्या काही मंडळींच्या संपर्कात असतो. कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्याचे महत्वाचे भाग आहेत. आमच्या प्राथमिक कामाची सुरुवात या शाखेपासून झाली, असे अनुभव म्हस्के यांनी सांगितले. ‘अर्ध्या तासात शेतकऱ्यांची दैना पाहून झाली, नाईट लाईफसाठी स्वारी सातच्या आत घरी परत आली’, अशी काव्यपंक्ती उदधृत करुन म्हस्के यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. यापूर्वीच्या सरकारच्या काळातील नकारात्मक वातावरण दूर होऊन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात गतिमानतेने लोकांची, शेतकऱ्यांची कामे होत आहेत. विकासाचे निर्णय धडाधड घेतले जात आहेत, असे माजी महापौर म्हस्के यांनी सांगितले.