बदलापूरः गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या माजी आमदार पांडूरंग बरोरा यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निवडणूक लढताना त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दौलत दरोडा यांनी धुळ चारली होती. विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत बरोरा शिवसेनेत होते. त्यावेळीही त्यांचा पराभव झाला. त्यापूर्वी पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून आमदार होते. भाजप प्रवेशासाठी माजी मंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला होता. या पक्ष प्रवेशामुळे शहापुरातील भविष्यातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघ हा दोन कुटुंबातील राजकीय स्पर्धांमुळे गेल्या तीन दशकांपासून ओळखला जातो. बरोरा आणि दरोडा या दोन कुटुंबातील थेट लढत गेल्या सात विधानसभा निवडणुकांमध्ये शहापूर मतदारसंघात पाहायला मिळाली आहे. यातील पाच निवडणुकांमध्ये दौलत दरोडा विजयी झाले आहेत. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढलेले दौलत दरोडा यांनी तत्कालीन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे आमदार महादू बरोरा यांना पराभूत केले होते. महादू बरोरा हे पांडूरंग बरोरा यांचे वडील. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये असलेल्या बरोरा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये जाणे पसंत केले. १९९९ सालच्या निवडणुकीतही महादू बरोरा यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र २००४ च्या विधानसभा निवडणुकीत महादू बरोरा यांनी दौलत दरोडा यांचा पराभव केला.

या पुढच्या २००९ सालच्या निवडणुकीत महादू बरोरा यांचे पुत्र पांडूरंग बरोरा यांनी दौलत दरोडा यांच्याविरूद्ध निवडणूक लढवली. मात्र पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि दौलत दरोडा पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. त्यापुढच्या निवडणुकीत २०१४ साली पांडूरंग बरोरा हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर शिवसेनेचे दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाऊन तिकीट मिळवले होते.

मात्र पांडूरंग बरोरा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दौलत दरोडा यांचा यात विजय झाला. त्यानंतर राज्यात झालेल्या अभूतपूर्व पक्षफुटीच्या घटनांनंतर दौलत दरोडा यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात राहणे पसंत केले. तर विधानसभेच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला गेल्याने पांडूरंग बरोरा यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र पांडूरंग बरोरा यांना सलग दुसऱ्या निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पांडूरंग बरोरा अस्वस्थ असल्याची चर्चा होती.

अखेर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पांडूरंग बरोरा यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बरोरा यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपाची शहापुरातील ताकद वाढणार असल्याचे बोलले जाते. त्याचवेळी स्थानिक राजकीय समिकरणेही बदलण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

राजकीय समीकरणे बदलणार ?

शहापूर मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे होता. मात्र अजित पवारांच्या महायुतीतील समावेशाने हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेला. मात्र यावरील शिवसेनेचा दावाही कमी झाल्याचे बोलले जाते. त्यात आता माजी आमदार आणि दावेदार असलेले पांडूरंग बरोरा भाजपात गेल्याने भविष्यात या मतदारसंघावरही भाजप दावा करणार असल्याचे बोलले जाते. या मतदारसंघात भाजप शिवसेनेला शह देणार की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.