राज्याच्या राजकारणात लिलावांचा बाजार सुरू आहे. कोण कुठे आहे ते कळत नाही. शिवगर्जना अभियानानिमित्त एकत्र आलेली मंडळी ही निष्ठेची आणि स्वाभिमानाची मंडळी आहेत. ती इतरांसारखी सौदाबाजी करणारी मंडळी नाहीत, अशी टीका कल्याण लोकसभेचे संपर्कप्रमुख, माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळून केली.
डोंबिवलीत शिवसेनेतर्फे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिवगर्जना अभियानांतर्गत शिवसैनिकांना मार्गदर्शन मेळाव्याचे सर्वेश सभागृहात आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, पत्रकार दिलीप मालवणकर, शहरप्रमुख विवेक खामकर, जिल्हा संघटक कविता गावंड, संपर्कप्रमुख शशिकांत परीकर, शहर संघटक मंगला सुळे, अभीजित थरवळ, प्रशांत कारखानिस, प्रसाद चव्हाण, माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे उपस्थित होते.
हेही वाचा- ठाणे : शिळफाटा रस्त्यालगतची १५० अतिक्रमणे जमीनदोस्त
शिवगर्जना अभियानाच्या माध्यमातून फिरताना आपणास उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावाचा वापर करायचा आहे. आपली ताकद आपण योग्यवेळी दाखवून देणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या भागात आहे ती लोकांची विकास कामे करायची आहेत. पुण्याची निवडणूक, सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निकाल पाहता येत्या काळात लवकर निवडणुका होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे आपणास खूप कष्ट घेऊन, समर्पित भावाने कामे करायची आहेत. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली व्यूहरचना तयार ठेवा. योग्यवेळी त्याचा वापर करा. आपण नक्की बाजी मारू, असा विश्वास भोईर यांनी शिवसैनिकांना दिला.
जिल्हाप्रमुख थरवळ यांनी कार्यकर्त्यांना येत्या काळातील परिस्थिती आणि आपली कणखर भूमिका कायम ठेऊन करावयाची लोकांची कामे, शहर परिसरातील रखडलेले विकास प्रकल्पांचे विषय मार्गी लावण्यासाठी करावयाचा पाठपुरावा याविषयी मार्गदर्शन केले. आपण आपल्या चौकटीत राहून लोकांच्या कामांना प्राधान्य द्यायचे. तीच पोचपावती आपणास योग्य मिळेल असा विश्वास थरवळ यांनी व्यक्त केला.