ठाणे : ‘बनत होता, बनत आहे आणि बनतच राहील पलावा पूल’,… ‘तारखांच्या आश्वानांनी फुल्ल, कधी होणार दोन्ही पलावा पुल ?’ असा प्रश्न उपस्थित करत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू असलेला पलावा पूल पूर्ण होत नसल्याने वाहनचालकांना दररोज तासनतास या भागात कोंडीत अडकून पडावे लागते. परिणामी वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि श्रमही खर्च होत असून वाहनचालकांत संतापाचे वातावरण आहे. हा पूल कधी पूर्ण होईल, याबाबत साशंसकता असून कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे १ एप्रिलचा मुहुर्त साधत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ३१ एप्रिलला पलावा पुलाचे उद्घाटन कुणाल कामरा याच्या हस्ते होईल असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे.

ठाणेपल्याड वाहतुकीसाठी सर्वाधिक महत्वाचा असलेला शिळफाटा – कल्याण रस्ता गेल्या काही वर्षात विकसीत केला जात आहे. या रस्त्याचे रूंदीकरण झाले. शिळफाटा आणि मुंब्रा फाटा येथे उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या भागात होणारी वाहतूक कोंडी थांबली. अवजड वाहनांची संख्या मोठी असल्याने येथे मोठी कोंड होत होती. मात्र कल्याण फाटा येथे अजुनही मोठी कोंडी होते. येथेही नव्या उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. मात्र या मार्गावर पलावा हा सध्याच्या घडीला अरूंद मार्ग बनला आहे.

कल्याण ते पलावा पर्यंत चार पदरी रस्ता आहे. कल्याणहून पलावाकडे जाताना सध्या कल्याण आणि डोंबिवलीतील वाहनचालकांना मेट्रोच्या कामाचा अडथळा पार करावा लागतो. त्यातून सुटका झाल्यानंतर पलावा वसाहतीजवळच्या चौकात वाहतूक कोंडीत अडकावे लागते.

सकाळी ठाणे, नवी मुंबईकडे जाताना तर सायंकाळी कल्याण – डोंबिवलीकडे परतताना येथे मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. या पुलातीक एक मार्गिका मार्च २०२४ पर्यंत पूर्ण केला जाईल, असे आश्वासन स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले होते. मात्र पलावाहून डोंबिवलीच्या दिशेला उड्डाणपूल उतरण्यासाठी जागाच नसल्याने या पुलाची कोंडी झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे पलावा बाजूच्या एका मार्गिकेचे काम बहुतांशी पूर्ण झाले असले तरी दुसरी मार्गिका आणि डोंबिवलीच्या दिशेला उड्डाणपूल उतरवण्याचे काम अपूर्ण आहे. पुढच्या काही महिने तरी हे काम पूर्ण होईल अशी शक्यता वाटत नाही.

या मुद्द्याला धरून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका केली आहे. १ एप्रिलचा मुहुर्त साधत त्यांनी पलावा पुलाचे उद्घाटन होणार ३१ एप्रिलला, उद्धाटक – कुणाल कामरा असा संदेश पोस्ट केला आहे. खाली एप्रिल फुल असेही लिहिले आहे. सोबतच आपल्या फेसबुक खात्यावर लिहितांना त्यांनी पुलावरून खोचक टोलाही लगावला आहे. ‘तारखांच्या आश्वासनांनी फुल्ल, कधी होणार दोन्ही पलावा पुल ?’ असा मार्मिक प्रश्न उपस्थित केला आहे. सोबतच ‘…. की, बनत होता… बनत आहे.. बनतच राहील पलावा पूल ?’ असेही त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

यापूर्वीही राजू पाटील यांनी या पुलाच्या कामावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. आता पुन्हा पाटील यांनी शिंदे पितापुत्रांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर आता शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र या सर्व राजकीय वादात सर्वसामान्य वाहनचालकांच्या नशिबी कोंडीच आहे.