ठाणे : ठाणे जिल्ह्यात अनेक आमदार आहेत. परंतु असे असताना साताऱ्याचा माणूस ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री बसवून ठेवला जात आहे. येथे कोणाला कामच करुन द्यायचे नाही. येथे केवळ एकाधिकारशाही सुरू आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
नवरात्रोत्सवा निमित्ताने टेंभीनाका येथील देवीचे दर्शन आणि आरती माजी खासदार राजन विचारे यांनी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. येथील उद्योग गुजरातला नेले जात आहेत, येथून तरुणांंना बेरोजगार करण्याचे काम या राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगले सरकार या निवडणुकीत जनता निवडून आणले यासाठी पाठीशी राहावे असा आर्शिवाद मागितला असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ठाणे महापालिकेची अवस्था वाईट आहे. तीन तीन वर्ष ठेकेदारांचे देयक दिले गेले नाही. महापालिकेच्या निधीसाठी आयुक्त दर एक तारखेला मुख्यमंत्र्यांकडे कटोरा घेऊन जातात. आम्ही ठाणे महापालिकेत काम केले आहे. परंतु आता रुपयातले ६० पैसे भ्रष्टाचारासाठी द्यावे लागत आहे अशी टीकाही विचारे यांनी केली.
हेही वाचा >>>प्रदुषणाकारी इंधन वापरणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील बेकऱ्यांना नोटिसा
मुंबई महापालिकेची अवस्था देखील वाईट आहे. निवडणूक घ्यायला हे लोक मागत नाही. हे सरकार फक्त खूर्चीसाठी काम करत आहेत. त्यांचे लोक येऊन भूलथापा देत आहेत असेही ते म्हणाले. पक्ष चिन्हाबाबत न्यायालयात न्याय मिळत नाही. अडीच वर्ष सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत. जनतेच्या न्यायालयात आम्हाला कौल मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.