लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात पैशांच्या उधळणीचे चित्रीकरण प्रसारित झाले. या घटनेनंतर विरोधकांकडून शिंदे गटावर टीका केली जात आहे. शनिवारी ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. लाज शिल्लक असेल तर तुम्ही माफी मागा अशी टीका राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

आनंद आश्रमात सर्व जाती धर्मातील नागरिकांना आनंद दिघे यांनी न्याय दिला होता. आनंद दिघे यांच्या नावाखाली हजारो लोक मोठे झाले. परंतु त्याच आनंद आश्रमात स्वत:चे नाव टाकून शिवसेना संपविण्याचे, कार्यकर्त्यांचा रोजगार बळकविण्याचे आणि आनंद दिघे यांनी तयार केलेल्या कार्यकर्त्यांना संपविण्याचे काम सुरू झाले आहे. आता आनंद आश्रमात पैशांच्या उधळणीचे चित्रीकरण पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात गेली आहे. आनंद दिघे हयात असते तर तुमची हिंमत झाली असती काय? त्यांनी तुम्हाला हंटरने बडवले असते असे राजन विचारे म्हणाले.

आणखी वाचा-कल्याणमध्ये तरूणीची छेड काढल्याने,दोन गटात हाणामारी

ज्या आनंदाश्रमामधून गोरगरिबांना न्याय देण्याचे काम अनेक वर्ष करण्यात आले त्यावर तुम्ही स्वत:ची पाटी लावली अशी टीकाही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आमच्यासाठी आनंद आश्रम मंदिर आहे. या पवित्र आश्रमात अशी घटना घडली आहे. ही दिघे यांची संस्कृती असल्याचे सांगत या घटनेची पाठराखण करत आहेत. लाज वाटत नाही का? अशा घटनेचे समर्थन करताना अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली.

Story img Loader