ठाणे : नवी मुंबईतील उद्धव ठाकरे पक्षाचे नवी मुंबईचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांच्यासह काही नगरसेवकांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला नवी मुंबईत मोठे खिंडार पडले आहे.
शिवसेनेच्या फूटीनंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. परंतु नवी मुंबईत अनेक माजी नगरसेवक ठाकरे गटामध्ये होते. यामध्ये माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांचा सामावेश होता. द्वारकानाथ भोईर हे नवी मुंबईत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख होते. रविवारी त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. द्वारकानाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक दयानंद माने, मधूकर राऊत, मेघाली मधूकर राऊत, उपशहर प्रमुख संजय देसाई यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
नवी मुंबईत मागील काही महिन्यांपासून पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्यास सुरूवात केली आहे. त्यातच, आता माजी नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करत असल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.