ठाणे: यापूर्वी मुंबईतील रस्ते धुतलेले कोणी पाहिले आहेत का? घरात बसून लोकांची काम होत नाहीत. त्यासाठी रस्त्यावर उतरावा लागतं लोकांमध्ये मिसळावे लागते. मुंबई बाहेर गेलेला मराठी माणूस आम्हाला मुंबईत परत आणायचा आहे. त्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केला. मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हारून खान आणि त्यांचा पत्नी माजी नगरसेविका ज्योती हारुन खान यांनी ठाणे येथील किसन नगर या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील शाखेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, हारून खान यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या आधीही पाच मुस्लीम नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष असे मिळून ही संख्या ५० नगरसेवकांच्या वर गेली आहे. मुंबईतील आपापल्या भागातील विकासाचे प्रश्न सुटावेत यासाठी हे सारे शिवसेनेमध्ये प्रवेश करत असून ही संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा… कल्याणमध्ये वकिलाच्या शाळकरी मुलाचे अपहरण

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असो, किंवा सध्या सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हजार टँकर्सच्या माध्यमातून एक दिवसाआड मुंबईतील रस्ते स्वच्छ करून धुतले जात आहेत. आपण स्वतः या अभियानात सहभागी होऊन पालिका अधिकाऱ्यांकडून हे काम करून घेत असून त्यामुळे शहर अधिक सुंदर होत आहे. यापूर्वी कधीही मुंबईतील रस्ते धुतलेले कुणी पाहिले होते का..? मात्र आज ते स्वच्छ करून मग धुतले जात आहेत. पावसाळ्यातही आपण जातीने भेट देऊन नालेसफाईची पाहणी केली त्यामुळे यंदा रस्त्यावर पाणी सचल्याचा फारशा तक्रारी आल्या नाहीत, रस्त्यावर फारसे खड्डे देखील दिसले नाहीत हे सारे करायचे तर प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागते प्रत्यक्ष काम करावे लागते घरात बसून हे साध्य होत नाही असेही यावेळी बोलताना शिंदे यांनी सांगितले.

विक्रोळी पार्क साईट परिसरातील रुग्णालयाची प्रलंबित मागणी असो किंवा या भागातील रखडलेले एसआरएचे प्रकल्प असो ते शासनाच्या वतीने गती देऊन पूर्ण केले जातील. मुंबईतील आशा रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एमएसआरडिसी, म्हाडा, सिडको, एमआयडिसी अशा सर्व यंत्रणांना एकत्रित करून या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे यावेळी बोलताना शिंदे यांनी सांगितले. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.