शहरी आणि ग्रामीण भागाचा आज मोठय़ा प्रमाणात विकास होत आहे. आधुनिक सोयीसुविधांमुळे माणसांना समाधान तर मिळते, मात्र आत्मिक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. जीवनातील दु:ख निवारण्यासाठी मनाचे समाधान आवश्यक असून, अध्यात्माच्या माध्यमातून ते आपणास मिळू शकते. त्यासाठी साधूसंतांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी येथे एका कार्यक्रमात केले.
माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात तीनदिवसीय जीवन दर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शविली यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर देविसिंग पाटील, स्वामी गोविंददेव गिरी, शिल्पा सिंगारे, माजी आयुक्त रामनाथ सोनावणे, सुशीला लाहोटी, किरण राठी, अल्पना लोढ्ढा आदी मान्यवर उपस्थित होते.
माहेश्वरी महिला मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्या पुढे म्हणाल्या, एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला आपण जातो, मात्र त्यातून दिला जाणारा संदेश आपण आचरणात आणत नाही. तो आचरणात आणला पाहिजे, आपली जीवनपद्धती आपण तशी बनविली पाहिजे. आध्यात्मिक कार्यक्रमामुळे आपल्यात सकारात्मक दृष्टिकोन वाढतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. हल्ली माणसांचे जीवन धावपळीचे झाले आहे, स्पर्धा वाढल्या आहेत. मानसिक शांती भंग पावत असून, त्यासाठी आध्यात्मिक विचारांची गरज आहे. संत महात्म्यांचे मार्गदर्शन आपल्याला चांगला मार्ग दाखविते. त्यासाठी आध्यात्मिक कार्यक्रम झाले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

Story img Loader