लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : महापालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष म्हणून १९७४-८१ याकालावधीत सतीश प्रधान यांनी काम पाहिले. शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. १९८६-८७ या काळात त्यांनी शहराचे पहिले महापौर पद भूषविले. यासह शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केले. राजकारणासोबतच सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्यही उल्लेखनीय आहे. त्या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता, म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी सुरू केले. शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान लाभले आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झाले आहे.
आणखी वाचा-ठाण्यातील खारफुटी नष्ट करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते. रविवारी, दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी, सकाळी १० वाजता ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सतीश प्रधान यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात मोठी पोकळीक निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सतीश प्रधान यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांमधून समाजमाध्यमांवर श्रद्धांजली
ठाणे शहरातील एक अग्रगण्य लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका बजावलेले राज्यसभेचे माजी सदस्य सतीश प्रधान निधनाचे वृत्त आले आणि धक्का बसला. त्यांनी ठाणे शहराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी केलेले प्रयत्न नेहमीच स्मरणात राहतील. -प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
आणखी वाचा-नाशिक मुंबई महामार्गावर अपघात, अपघातात दोघे जखमी
ठाणे महापालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर, शिवसेना नेते तसेच स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीचे काम पाहिलेले सतीश प्रधान यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. -नरेश म्हस्के, खासदार
अनेक वर्षांपासून सतीश प्रधान आणि ठाणे असे अतुट नाते होते. पहिले नगराध्यक्ष, महापौर म्हणून सतीश प्रधान यांचे नाव ठाण्याशी जोडलेले होते. शैक्षणिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांशी निगडीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे निधन ठाणेकरांना चटका लावून जाणारे आहे. -संजय केळकर, आमदार