बदलापूर : महायुतीतील कुरबुऱ्या आता उघडपणे सुरू असून मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सोमवरी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी हाती तुतारी घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेत बंडखोरीची सुरूवात झाली असताना आता बदलापूर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रेही भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. येत्या २८ ऑक्टोबर रोजी म्हात्रे अर्ज भरण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्वात चर्चेतील मतदारसंघ म्हणून मुरबाड विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच मुरबाड विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला. येथील भाजपचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध उघड भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतरही भाजपच्या वरिष्ठांनी विद्यमान आमदार किसन कथोरे यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपातील कथोरे विरोधकांना मोठा धक्का बसला. भाजपच्या वरिष्ठांनी कथोरे यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे भाजपातून तिकिटासाठी प्रयत्नशील असलेल्यांनाही धक्का लागला. मात्र भाजपातून तिकिट जाहिर झाल्यानंतर उघडपणे कुणीही बंडखोरी केली नाही. मात्र त्याचवेळी भाजपासोबतच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत मात्र बंडखोरीला सुरूवात झाली आहे. सोमवारी शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी काही शिवसेना पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार ) पक्षात प्रवेश केला. त्यांनी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे कथोरे यांना सुभाष पवार आव्हान देणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

हेही वाचा…नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक करणार भाजपला रामराम, शरद पवारांच्या राष्ट्रवादी करणार पक्षप्रवेश ?

मात्र त्याचवेळी बंडाचे दुसरे निशाण बदलापूर शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे फडकवणा असल्याचे स्पष्ट झाले आहे. वामन म्हात्रे कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात असतील अशी शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. येत्या २८ ऑक्टोबर रोजी म्हात्रे अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. म्हात्रे यांच्या या निर्णयामुळे महायुतीत सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. म्हात्रे बदलापूर शहरातील शिवसेनेचे सर्वेसर्वा मानले जातात. त्यांनीच महायुतीविरोधी भूमिका घेतल्याने कथोरे यांच्या प्रचारात शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी होती का याबाबतही साशंकता व्यक्त होते आहे.

हेही वाचा…बचत गटांच्या सरस महोत्सवांना आचार संहितेची झळ..! दिवाळी निमित्त होणाऱ्या आर्थिक उलाढालीत यंदा खंड

महायुतीचा धर्म पाळला नाही

आमदार किसन कथोरे यांना गेल्या निवडणुकीत शिवसेनेने मोठी मदत केली. त्यामुळे ते भाजपातून सर्वाधिक फरकाने निवडून आलेले आमदार ठरले. मात्र कथोरे यांनी वेळोवेळी शिवसेनेला विश्वासात घेतले नाही. मतदारसंघात मतदारांना सामोरे जाताना महायुती म्हणून जाणे अपेक्षित होते. मात्र निवडणुकीपूर्वी केलेल्या भूमीपूजन, उद्घाटन कार्यक्रमात शिवसेनेला स्थान दिले नाही, अशी तक्रार शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.