बदलापूरः मी भाजपचा एक लहान कार्यकर्ता आहे. सध्या त्यांच्यासाठी मी महत्वाचा नसेल, म्हणून मला अर्ज भरताना बोलवले गेले नाही, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या अर्ज भरण्याच्या दिवशी कपिल पाटील कुठेही दिसले नाही. त्याबाबत विचारले असता पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. मला आमंत्रण दिले तर नक्कीच प्रचारात उतरेल. पण मला कोण आमंत्रण देईल, असा प्रश्नही कपिल पाटील यांनी उपस्थित केला. गेल्या काही वर्षात पाटील आणि कथोरे यांच्यात विसंवाद होता. आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांना सामोपचाराने वागण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर थेट आरोप केला होता. पराभवाचे खापर कथोरे यांच्यावर पाटील यांनी फोडल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विसंवाद वाढला आहे. त्यापूर्वी एकमेकांवर अप्रत्यक्ष टीका करणारे दोन्ही नेते उघडपणे बोलू लागले. पाटील यांनी निष्ठावंतांचा मेळावा घेत कथोरेंना पक्षातच आव्हान निर्माण केले. त्यानंतरही भाजपने कथोरे यांना उमेदवारी दिली. काही दिवसांपूर्वी कथोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप श्रेष्ठींनी मतभेद दूर करण्याचा सल्ला देत पक्षाचे नुकसान नको असा संदेश दोन्ही नेत्यांना दिल्याची चर्चा आहे. मात्र त्यानंतरही पाटील हे कथोरे यांच्या अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी दिसले नाहीत.

हेही वाचा >>>‘फुकट फौजदारां’कडून महागड्या वस्तूंचा वापर, मुंबई उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

बुधवारी कपिल पाटील यांनी बदलापुरात आपल्या समर्थकांची बैठक घेतली. याबाबत कपिल पाटील यांनी लोकसत्ताशी संवाद साधला. माझे बदलापुरात कार्यालय असून नियमीतपणे तिथे मी नागरिकांना भेटतो. त्यावेळी समर्थक येत असतात, असे स्पष्टीकरण त्यांनी बैठकीच्या प्रश्नावर बोलताना दिली. कथोरे यांच्या अर्ज दाखल करतेवेळी अनुपस्थित राहण्याबाबत विचारले असता, सध्या मी त्यांच्यासाठी महत्वाचा नसेल. त्यामुळे मला बोलवण्यात आले नाही. बोलवले नाही तर कसे जाणार असेही पाटील म्हणाले. कथोरे यांच्या प्रचारात प्रत्यक्षपणे उतरणार का असा प्रश्न पाटील यांना केला असता, मी महायुतीचा, भाजपचा कार्यकर्ता आहे. मी माझ्या परिने प्रचार करेल. महायुतीचा प्रचार करण्याच्या सूचनाही मी माझ्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. आता ज्यांनी मला आमंत्रण दिले नाही, जे माझा फोटो वापरत नाही, त्यांना माझी गरज नसेल. त्यांच्या प्रचारात कसे जाणार, असेही पाटील यावेळी म्हणाले. प्रचारासाठी आमंत्रण दिले तर प्रचारात उतरणार का असे विचारले असता, माझी गरजच नसेल तर मला आमंत्रण कोण देईल, असे पाटील म्हणाले.

मुरबाडमध्ये घेतलेल्या निष्ठावंताच्या मेळाव्याबाबत पाटील यांना विचारले असता, मी मेळावा उघडपणे घेतला  होता, लपुनछपून घेतला नव्हता. त्या मेळाव्याला पाच हजारांहून अधिक लोक आले होते. त्यांनी त्यांची मते मांडली, असेही पाटील यावेळी म्हणाले.