कल्याण – नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशोक प्रधान (८४) यांच्या कल्याण येथील बंगल्यात शिरून पाच जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेतील एका निलंबित शिक्षक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रधान मुंंबईतील रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, कल्याण जनता बँकेचे विश्वस्त, कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. ते कल्याण पश्चिमेतील कर्णिक रस्त्यावरील प्रधान बंगल्यात अनेक वर्ष राहत आहेत. या मारहाण प्रकरणी अशोक प्रधान यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात निलंबित शिक्षक संजय भागवंत जाधव (५०, रा. शिवम टाॅवर, खडेगोळवली, कल्याण पूर्व), संदेश नामदेव जाधव (३२, रा. सरस्वती काॅलनी, आनंदवाडी, विठ्ठलवाडी, कल्याण पूर्व) यांच्यासह दोन अनोळखी पुरूष आणि एक महिलेचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे करीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>>डोंबिवली : ठाकुर्ली पुलाच्या पोहच रस्त्यावर राडारोड्याचे ढीग
कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेचे अशोक प्रधान हे अध्यक्ष होते. या शाळेत संजय जाधव हे शिक्षक होते. जाधव यांना चार वर्षांपुर्वी काही कारणास्तव निलंबित करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी संजय जाधव हे प्रधान यांच्या कर्णिक रस्त्यावरील घरी गेले. ओळख असल्याने प्रधान यांनी त्यांना घरात घेतले. सोबत इतर तीन जण आणि एक महिला होती. नोकरी गेल्याने आपली परिस्थिती खूप हलाखीची झाल्याचे सांगत त्याने निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. याबाबत काहीच करू शकत नाही, असे प्रधान यांनी त्याला सांगितले. त्याचा राग येऊन संजय जाधव याच्यासह पाच जणांनी प्रधान यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश साळवी यांनी दिली.