लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली – माजी कुलगुरू प्रा. अशोक प्रधान प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शनिवार पासून येथील उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या मानपाडा-उंबार्ली येथील विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षकांनी शनिवारपासून काळ्या फिती लावून निषेध आंदोलन सुरू केले आहे. आठवडाभर हे निषेध आंदोलन सुरू राहणार आहे.

शिक्षणक्षेत्रातील एका प्रतिष्ठित व्यक्तिला एका बडतर्फ शिक्षकाकडून मारहाण होते. हे निंदनीय आहे. अशा प्रवृत्तीना वेळीच कायद्याने रोखले नाहीतर या प्रवृत्तींचे पेव फुटण्याची भीती आहे. एखाद्याने शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्याला शिकविताना समज दिली. संबंधित विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर त्या शिक्षकाच्या घरी जाऊन समाजकंटक त्या शिक्षकाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना दगाफटका करू शकतात. त्यामुळे प्रा. प्रधान यांच्या सारखा प्रकार अन्य कोणाबाबतही घडू नये. अशा आरोपी व्यक्तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे. प्रत्येक शाळेने प्रा. प्रधान यांना पाठिंबा देण्यासाठी अशाप्रकारे काळ्याफिती निषेध व्यक्त केला पाहिजे, असे विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस, ग्रामीण भागात गारा

काळ्या फिती लावून का शिकवले जात आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून दिली जात आहे. शिक्षणक्षेत्रात मारहाण, हल्ला अशी घुसणारी प्रवृत्ती वेळीच रोखली गेली पाहिजे. या प्रकरणाचा तपास योग्यरितीने होऊन संबंधितांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. प्रा. प्रधान यांना मारहाण म्हणजे समस्त शिक्षक वर्गाला मिळालेला हा इशारा आहे. प्रत्येक शिक्षण संस्थेने जागृत राहून या घटनेचा निषेध करावा, असे आवाहन पंडित यांनी केले आहे.

आमदारांकडून समर्थन

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रा. प्रधान यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध करून या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांनी करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन पोलिसांना केले आहे. येत्या विधीमंडळ अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याची तयारी काही आमदारांनी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former vice chancellor assault case protest by teachers of vidyaniketan school in dombivli by wearing black ribbons mrj
Show comments