कल्याण- डोंबिवली, कल्याण शहराच्या विविध भागात नालेसफाईची कामे जोरात सुरू असल्याचा देखावा पालिकेकडून उभा करण्यात येत आहे. नाले सफाईची कामे करताना नाल्यातील गाळ, गटारातील गाळ काठावर अनेक दिवस पडूनही ठेकेदाराकडून तो उचलला जात नाही. त्यामुळे पादचारी, परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.
नाले सफाई, गटार सफाईची कामे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करून मे अखेरपर्यंत पालिकेकडून पूर्ण केली जातात. यावेळी ठेकेदार नियुक्ती करताना गैरप्रकार झाल्याचे आरोप झाल्याने पालिकेने जुनी निविदा प्रक्रिया रद्द करुन नव्याने ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया केली. पाऊस तोंडावर आला असताना नाले सफाईच्या कामात दिरंगाई नको म्हणून काही ठेकेदारांना कामाचे आदेश न देता त्यांना विश्वासाने काम करण्यास सांगण्यात आले आहे, असे समजते.
हेही वाचा >>>डोंबिवलीतील फलकांवर नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री उल्लेख, छबीतून बाळासाहेब थोरात गायब
नाले सफाईची कामे व्यवस्थित चालू आहेत की नाहीत यासाठी यापूर्वी बांधकाम विभाग, मल निस्सारण विभागाचे अभियंता सतत देखरेख ठेऊन नाले सफाईची कामे करुन घ्यायचे. आता तसा कोणताही प्रकार दिसत नसल्याचे माजी नगरसेवकांनी सांगितले. जागोजागी नाले, गटारे गाळ, कचऱ्यानी भरलेली आहेत. पाऊस कधी पडतो याची ठेकेदार आतुरतेने वाट पाहत आहे. एकदा पाऊस सुरू झाला की ठेकेदार नाले, गटार सफाईची कामे अर्धवट स्थितीत सोडून देतात. पूर्ण कामाची देयके पालिकेतून काढून घेतात. ही पालिकेतील वर्षानुवर्षाची पध्दती आहे. तोच प्रकार पुन्हा यावेळी होण्याची शक्यता माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आरोपपत्र
कल्याण पूर्वेत लोकग्राम नाल्यातील गाळ, कचरा काढण्याची कामे ठेकेदाराकडून सुरू आहेत. अनेक दिवस झाले नाल्यातून काढलेला गाळ भीम चौकातील रस्त्यावर पडून आहे. गाळ टाकलेल्या भागातून दुर्गंधी सहन करत पादचाऱ्यांना जावे लागते. पुणे-लिंक रस्त्या खालील नाल्यांमध्ये जागोजागी वाहिन्यांमध्ये कचरा अडकून पडला आहे. डोंबिवलीतील भरत भोईर नाल्यातील गाळ, कचरा कायम आहे.
हेही वाचा >>>आंबिवलीतून चरस विकणारी महिला अटक
मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील गटारांची कामे ठेकेदारांनी हाती घेतली आहेत. अंतर्गत रस्ते, चाळी भागातील गटारांकडे ठेकेदार ढुंकुन पाहत नाहीत, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. मुंबई, ठाण्यातील नाले सफाई, रस्ते कामांची पाहणी करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक दिवस कल्याण डोंबिवली पालिका हद्दीचा दौरा करुन शहरातील खोदून ठेवलेले रस्ते, संथगती सुरू असलेले काँक्रीटची कामे, नाले, गटार सफाईचा बोजवारा यांची पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाचा लोकप्रतिनिधी सोयीप्रमाणे वापर करुन घेत असल्याने त्याचे चटके नागरिकांना नागरी समस्यांच्या माध्यमातून बसत आहेत, असे काही जागरुक नागरिकांनी सांगितले.