लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: गरीब, गरजू रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे म्हणून डोंबिवलीत मानव कल्याण केंद्र सुरू करुन त्या माध्यमातून लाखो रुग्णांवर वैद्यकीय उपचार करणारे डॉ. मूलचंद छेडा यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
मागील ४० वर्ष ते डोंबिवलीत वैद्यकीय सेवा देत होते. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा, या भावनेतून त्यांनी रुग्ण सेवा केली. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील टाटा लाईन खालील मानव कल्याण केंद्र हे गरीब, गरजू रुग्णांचे मोठे आधारस्थान आहे. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा याठिकाणी रुग्णांना माफक दरात पुरविल्या जातात. अनेक तज्ज्ञ डॉक्टर याठिकाणी सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा देतात.