ठाणे : ठाणेकरांना मनोरंजनाचे नवे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशातून उपवन तलावात तीन थीमवर आधारीत कांरजाचा लेझर शो प्रकल्प उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये राम मंदीर, श्री स्थानकापासूनचा ठाण्याचा प्रवास आणि मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या थीमचा समावेश असून त्याबाबत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत कांरजाचा लेझर शो दरम्यान माहितीही दिली जाणार आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रकल्पाचे काम पुर्ण करून त्याचे लोकार्पण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर डोंगराच्या पायथ्याशी उपवन तलाव आहे. या तलावाचे सौंदर्य वाढविण्यासाठी महापालिकेकडून तलाव परिसरात वेगवेगळ्या प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. या तलाव परिसरात ॲम्पी थिएटर आणि बनारस घाट उभारण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यापाठोपाठ आता तलावात तीन थीमवर आधारीत कांरजाचा लेझर शो प्रकल्प उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये राम मंदीर इतिहास, श्री स्थानकापासूनचा ठाण्याची झालेली जडणघडण आणि मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या थीमचा समावेश असून पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रकल्पाचे काम पुर्ण करून त्याचे लोकार्पण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी सोमवारी पालिका मुख्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून या प्रकल्पाची माहिती दिली.
राममंदिराचा इतिहास आणि झलक, श्री स्थानकचा प्रवास आणि मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या तीन थीमवर कारंज लेझर शो होणार आहे. हा शो दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेत विनामुल्य दाखवला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणेकरांना मनोरंजनाचे नवे साधन उपलब्ध होणार असून त्याचबरोबर शहराच्या इतिहासाची माहिती मिळणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. शरयू नदीवर होणाऱ्या महाआरतीप्रमाणेच उपवन येथील बनासर घाटावर आठवड्यातून एकदा महाआरती करण्याचा विचार असून खासगी संस्थांमार्फत हे नियोजन करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.