ठाणे : उल्हासनगर येथील ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने चारजणांना अटक केली. यामध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय साहाय्यक शशिकांत साठे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित कमलेश निकम, नरेश गायकवाड आणि गणपती कांबळे यांचा समावेश आहे. पोलिसांकडून तपास होत नसल्याने ननावरे यांच्या भावाने स्वतःचे बोट तोडले होते. त्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करत दर आठवड्याला शरीराचा भाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असल्याचे म्हटले. या प्रकारानंतर ठाणे पोलिसांनी कारवाई केली.
माजी आमदार पप्पू कलानी आणि ज्योती कलानी यांचे माजी स्वीय साहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी सुमारे दोन आठवड्यांपूर्वी पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून खाली उडी मारत आत्महत्या केली. ननावरे यांनी आत्महत्या केल्यानंतर उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली होती. त्यांनी आत्महत्या केल्यानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. आत्महत्येपूर्वी ननावरे यांनी एक चित्रफीत तयार केली होती. यात त्यांनी काहीजणांची नावे घेतली आहेत. नंदकुमार यांच्या आत्महत्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा : कडोंमपा विद्युत विभागाच्या कामासाठी सखाराम कॉम्पलेक्स मधील रस्ता आजपासून बंद
हेही वाचा : कल्याणमध्ये भाजपचा मूक मोर्चा, मुलीच्या हत्येप्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणाचा समांतर तपास खंडणी विरोधी पथकाकडून सुरू होता. दरम्यान या प्रकरणात पोलीस न्याय देत नसल्याचा आरोप नंदकुमार यांच्या भावाने केला होता. तसेच त्यांनी स्वतःचे बोट तोडण्याची एक चित्रफीत बनवून न्याय मिळेपर्यंत दर आठवड्याला शरीराचा भाग तोडून तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असल्याचे सांगितले होते. या प्रकारानंतर खंडणी विरोधी पथकाने चारजणांना अटक केली. यामध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय साहाय्यक शशिकांत साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते कमलेश निकम, नरेश गायकवाड आणि गणपती कांबळे यांचा समावेश आहे.