ठाणे : उथळसर भागात ठाणे महापालिकेच्या पुनर्वसन चाळीमध्ये भाड्याने वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. तसेच त्यांना भाड्याने घर उपलब्ध करून देणाऱ्या घर मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ठाणे महापालिका उथळसर प्रभाग समितीच्या मागील बाजूस मनोर पाडा येथील नागरिकांचे पुनर्वसन झाले आहे.
हेही वाचा >>> बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई
या चाळीमध्ये काही बांगलादेशी भाड्याने राहत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने येथील चाळीमध्ये जाऊन पाहाणी केली. चाळीमधील तीन घरांमध्ये चार बांगलादेशी महिला आढळून आल्या. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी बांगलादेशी असल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल आणि रोकड जप्त केली आहे. त्यांच्याविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर घर मालकाविरोधातही यामध्ये गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.