अंबरनाथः प्रमुख उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार उभे करून त्यातून संभ्रम निर्माण करत मतांची फाटाफुट करण्याची खेळी गेल्या काही वर्षात सातत्याने केली जाते आहे. तसाच काहीसा प्रकार विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने बेलापूर, कल्याण पूर्व, अंबरनाथ आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघात झाल्याचे दिसून आले आहे. बेलापूरमध्ये संदिप नाईक, मंदा म्हात्रे, मुरबाड विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सुभाष पवार यांच्या आणि अंबरनाथ विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात आहेत. कल्याण पूर्वेत महेश गायकवाड या नावाचेही दोन उमेदवार रिंगणात आहेत.

नामसाध्यर्म असलेले उमेदवार उभे करून एखाद्या उमेदवाराला पाडण्याचा प्रकार यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये झाला आहे. मतांची विभागणी झाल्याने उमेदवार पराभूत झाल्याचेही प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. मात्र ही खेळी सातत्याने केली जात असल्याने यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमधून दिसून आली आहे. यंदाच्या निवडणुकीतही ठाणे जिल्ह्यात चार मतदारसंघात नावात साम्य असलेले उमेदवार दिसून आले आहेत. विशेष म्हणजे चारही मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. यात भाजपाला रामराम ठोकत उमेदवारीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षात गेलेल संदिप गणेश नाईक यांच्या नावाशी साधर्म्य असलेले संदिप प्रकाश नाईक बेलापूरमध्ये अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर भाजपच्या अधिकृत उमेदवार मंदा विजय म्हात्रे यांच्या नावाशी साम्य असलेल्या मंदा संजय म्हात्रे या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे करून मतांची विभागणी करण्याची ही रणनिती असल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा >>>कथोरेंसाठी कदाचित मी महत्त्वाचा नसेन, म्हणून मला आमंत्रण नव्हतं; आमदार किसन कथोरेंबाबत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे वक्तव्य

दुसरीकडे मुरबाड विधानसभा मतदारसंघात सध्या चुरशीची लढत आहे. येथे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे सुभाष पवार यांचे आव्हान आहे. कथोरे यांना स्वपक्षियांशीही लढण्याची वेळ सध्या आली आहे. भाजप आणि महायुतीतील नाराजांचा सामना त्यांना करावा लागणार आहे. मात्र सुभाष गोटीराम पवार यांच्या नावाशी साम्य असलेले सुभाष शांताराम पवार यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे पवार यांच्या मतांना विभागण्याची ही खेळी चर्चेचा विषय बनली आहे. तर शेजारच्या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून रिंगणात असलेले राजेश देवेंद्र वानखेडे यांच्या नावाशी साम्य असलेले राजेश अभिमन्यू वानखेडे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. राजेश वानखेडे हे अंबरनाथचे विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरूद्ध रिंगणात उतरले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत वानखेडे अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे नावात साम्य असलेले अपक्ष उमेदवार उभे करून वानखेडेंची मते विभागण्याची ही खेळी असल्याचे बोलले जाते.