लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : धुळवडीचा आनंद घेतल्यानंतर उल्हास नदीत अंघोळीसाठी गेलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. बदलापूरच्या वेशीवर असलेल्या चामटोली येथील नदीपात्रात ही घटना घडली चारही तरुण दहावीचे विद्यार्थी होते.

शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास बदलापूरच्या वेशीवर असलेल्या पोद्दार गृह संकुलातील सात ते आठ मुले धुळवड खेळल्यानंतर उल्हास नदीत अंघोळीसाठी गेले होते. या भागात नदीपात्राला खोली असून पाण्याचा अंदाज न आल्याने आर्यन मेदर (१६) हा तरुण बुडू लागला. त्यावेळी इतर तरुण त्याला वाचवण्यासाठी गेले. या प्रयत्नात आर्यन सिंग (१५) सिद्धार्थ सिंग (१६) आणि ओमसिंग तोमर (१५) हे सुद्धा बुडाले, अशी माहिती कुळगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली आहे.

तरुण ज्या ठिकाणी गेले त्या भागात सहसा कुणी जात नाही अशीही माहिती पाटील यांनी दिली. तर हा प्रकार पाहून ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. यावेळी इतर चार मुलांना ग्रामस्थांनी सुखरूप पाण्याबाहेर काढले. या घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. चौघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले होते.