कल्याण – डोंबिवली जवळील दावडी गावातील एका विकासकाची नऊ वर्षापूर्वी पैशाच्या वादातून चार जणांनी हत्या केली होती. या प्रकरणातील चार जणांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी. आर. अस्तुरकर यांनी जन्मठेपेची आणि १४ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. गणेश मनिया चव्हाण (३६) असे हत्या झालेल्या विकासकाचे नाव आहे. ते बांधकाम व्यावसायिक होते. जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांमध्ये दत्तू गोपाळ पवार (४०), स्वप्निल उत्तम पडवळ (३४) आणि कुमार भिमसिंग चव्हाण (४२), संतोष भिमसिंग चव्हाण (३४) या दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. अन्य आरोपींमध्ये एका रिक्षा चालकाचा समावेश होता. परंतु, न्यायालयाने उलटतपासणीच्या वेळी तपासातील काही त्रृटींची दखल घेऊन रिक्षा चालकाची निर्दोष मुक्तता केली.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तरूणाविरूध्द गुन्हा
या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी होते. एक जण खून झाल्यानंतर फरार झाला. दुसरा तात्पुरत्या जामिनावर बाहेर होता. तोही नंतर बेपत्ता झाला. त्यामुळे हे दोन्ही आरोपी सुटकेपासून तात्पुरते बचावले आहेत. फरार दोन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अतिरिक्त सरकारी वकील ॲड. कदम्बिनी खंडागळे यांनी सांगितले, विकासक गणेश चव्हाण यांनी आरोपी संतोष चव्हाण यांना दोन लाख रूपये उसने दिले होते. आपले पैसे परत द्यावेत म्हणून विकासक चव्हाण आरोपी संतोष यांच्याकडे तगादा लावत होते. वेळकाढूपणा करून संतोष पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. विकासक चव्हाण सतत पैसे मागत असल्याने त्याचा राग संतोषला होता. पैसे देण्याचा कायमचा त्रास संपविण्यासाठी संतोष चव्हाणने इतर आरोपींच्या सहकार्याने विकासक गणेशला ठार मारण्याचा कट रचला. सप्टेंबर २०१५ मध्ये मयत विकासक गणेश दावडी गावातील रस्त्यावरून जात असताना आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याला ठार मारले. त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला डाॅक्टरने मृत घोषित केले. या प्रकरणात एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले होते. अतिरिक्त सरकारी वकील खंडागळे, साहाय्यक सरकारी वकील ॲड. रचना भोईर यांनी या प्रकरणात सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पोलीस ठाणे व न्यायालय यांच्या मध्ये सादरकर्ता म्हणून हवालदार ए. आर. गोगरकर यांंनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. ढिकले यांनी केला होता.