लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका जवळ रविवारी सकाळी ट्रकची एका टँकरला धडक बसली. या अपघातात चार जण जखमी झाले. ट्रक चालक इजाज अहमद (४०), त्याचा सहकारी राशिद अब्दुल (२६), प्रवासी अमजर खान (३५), अब्दुल समत (२३) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक येथील मालेगावमधून ट्रक मुंबईच्या दिशेने वाहतुक करत होता. या ट्रकमध्ये आठ प्रवासी प्रवास करत होते. तसेच १२ टन मैदा होता. रविवारी सकाळी ६ वाजता हा ट्रक खारेगावजवळ आला असता, इजाज अहमद यांचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक समोरील एका टँकरला धडकला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या पुढील भागाचा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रकमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.
आणखी वाचा-कल्याणमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपी संभाजीनगर मधून अटक
तसेच ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात इजाज यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर, अमजर यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. राशीद आणि अब्दुल यांना किरकोळ दुखापत झाली आहे. यातील अब्दुल यांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. उर्वरित तिघांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावर काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने रस्त्यामधून बाजूला करण्यात आली आहेत.