भगवान मंडलिक, लोकसत्ता
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची कामे करण्याऐवजी पालिकेच्या बांधकाम विभागातील चार अभियंत्यांनी विदेशी पर्यटन केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पालिका प्रशासनाला अंधारात ठेवत काहींनी वैद्यकीय रजेचे कारण देऊन हे विदेशी पर्यटन केल्याचीही चर्चा आहे. या संदर्भात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांनी याविषयी अनभिज्ञता दाखवली. यासंदर्भातची चौकशी केली जाईल, असे अधिकारी म्हणाला. मागील तीन महिन्यांपासून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे प्रवासी, शाळकरी विद्यार्थी हैरण आहेत. रुग्णवाहिका चालकांना कसरत करत रुग्णांची वाहतूक करावी लागते.
हेही वाचा >>> गंजलेल्या विजेच्या खांबामुळे दुर्घटनेची शक्यता; डोंबिवली एमआयडीसीतील प्रकार
ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली होती. या कालावधीत पालिकेच्या बांधकाम विभागाने डोंबिवली, टिटवाळा, कल्याण, २७ गाव येथील रस्ते सुस्थितीत करणे आवश्यक होते. गणपती विसर्जनाच्या तोंडावर पालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी अधिकाऱ्यांना तातडीने खड्डे भरण्याच्या आदेश दिले होते. त्यानंतर पाऊस सुरू असताना खड्डे भरण्याची कामे करण्यात आली. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर दररोज टिका होत आहे. शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली असताना, पालिकेतील एक वरिष्ठ अभियंत्यांसह तीन कनिष्ठ अभियंते गेल्या आठवड्यात विदेशात पर्यटन करून आल्याची पालिकेत जोरदार चर्चा आहे.
हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवली शहरे खड्ड्यात, अभियंत्यांचे मात्र विदेशी पर्यटन
आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे हे वैद्यकीय रजेवर आहेत. खड्डे विषयावरुन प्रशासन टीकेचे धनी होत असताना शहरात समर्पित भावाने काम करण्याऐवजी चार अभियंते विदेशात पर्यटनासाठी गेले. वैद्यकीय रजेचे कारण देऊन विदेशी पर्यटन केल्याचे प्रकरण बाहेर येऊ नये आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकू नये यासाठी संबंधित अभियंते जोरदार प्रयत्न करत असल्याचे समजते. काही दक्ष नागरिकांनी मात्र गेल्या दहा दिवसाच्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेतील कोणते अधिकारी विदेशात पर्यटन करण्यासाठी गेले होते याची माहिती भारत सरकारच्या इमिग्रेशन, पारपत्र विभागाकडून मागवली आहे. प्रशासनाला आणि वरिष्ठांना अंधारात ठेवून जे चार अभियंते विदेशी पर्यटनासाठी गेले होते, ते अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा >>> कल्याण: बनावट जात दाखल्यांद्वारे कंत्राटी कामगार पालिका सेवेत कायम; राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार
गेल्या महिन्यात नगररचना विभागातील उपअभियंता सुरेंद्र टेंगळे प्रशासनाला अंधारात ठेवून विदेशात गेले होते. विदेशातील खर्चासाठी त्यांनी पालिकेतील एका कनिष्ठ अभियंत्याची क्रेडिट कार्ड वापरली होती. हे सगळे प्रकरण आता बाहेर आले आहे. कल्याण मधील एका नागरिकाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. सुरेंद्र टेंगळे यांचे विदेश पर्यटनाचे प्रकरण सुरू असतानाच आता चार अभियंत्यांचे प्रकरण बाहेर आल्याने प्रशासनावर कोणाचा वचक आहे की नाही असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या कारभाराकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित अभियंत्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा व शिस्त नियमाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.