अंबरनाथ: राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने मुंबईतील विविध प्रभागांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना लवकरच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात सुरू होणार आहे. शहरातील पूर्व आणि पश्चिम भागात प्रत्येकी दोन असे चार दवाखाने येत्या एक मे रोजी सुरू होतील. शहरातील नागरिकांना मोफत उपचार आणि विविध आरोग्य सुविधा या रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहेत.
मुंबई महानगरपालिका आणि उपनगरक्षेत्रांमध्ये गेल्या काही महिन्यांत विविध ठिकाणी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले. या दवाखान्यांच्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार मिळतात. तसेच अनेक आरोग्य सुविधा या दवाखान्याच्या माध्यमातून देण्यात येतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर या दवाखान्यांची व्याप्ती वाढवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे. अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात चार आपले दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये मनसेला खिंडार, शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात सामील
अंबरनाथ पूर्व भागातील राहुल नगर, ठाकूर पाडा, तसेच अंबरनाथ पश्चिम भागातील भास्कर नगर परिसरातील बहुउद्देशीय समाज मंदिर आणि महाराष्ट्र गृहनिर्माण बोर्डात शिवनगर येथे सुरू करण्यात येणार आहेत. येत्या १ मे महाराष्ट्र दिनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे या आरोग्य केंद्रांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली. आरोग्य विभाग आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हजेरीत अमदरबडॉ. किणीकर या आरोग्य केंद्राची पाहणी केली. या आरोग्य केंद्रामुळे या परिसरासह लगतच्या परिसरातील नागरिकांना देखील चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचे डॉ. किणीकर यांनी सांगितले.
कोणकोणत्या सुविधा मिळणार
या दवाखान्यांमध्ये बाह्यरुग्ण विभाग असणार आहे. येथे दररोज तपासणी केली जाणार आहे. तसेच असांसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रम, लसीकरण, माता बाल संगोपन कार्यक्रमात येणाऱ्या रोगांवर उपचार केले जातील. रक्त, लघवी यांसारख्या तपासण्याही येथे केल्या जातील.
वैद्यकिय मनुष्यबळ असे
या आपला दवाखान्यात एक वैद्यकिय अधिकारी, एक परिचारिका, एक बहु उपयोगी कर्मचारी आणि दोन मदतनीस असे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हा उपक्रम राबवला जाणार असून यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पैसे खर्च केले जातील.