कल्याण – कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील एका मागतेकरी महिलेच्या दीड महिन्याच्या बालिकेची चार लाख रुपयांना विक्री करणाऱ्या बालिकेच्या मागतेकरी आईसह डोंबिवलीतील तीन जणांना ठाणे येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कल्याण पश्चिमेतील रामदेव हाॅटेलजवळील सहजानंद चौक येथे मंगळवारी अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैशाली किशोर सोनावणे (३५, रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, कोपररोड, डोंबिवली) या मध्यस्थ महिलेच्या माध्यमातून हा विक्री व्यवहार होत होता. वैशाली मूळच्या मालेगावच्या आहेत. दीपाली अनिल दुसिंग (२७, रा. सिध्दार्थनगर झोपडपट्टी), रेखा बाळू सोनावणे (३२) या बालिकेच्या विक्री व्यवहारातील बालिकेची आई आहेत. त्या कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात राहतात. किशोर रमेश सोनावणे (३४, रिक्षा चालक) अशी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल व्यक्तींची नावे आहेत.

हेही वाचा – मुख्यमंत्री येती शहरा, आधी रस्ते दुरुस्त करा; अंबरनाथमधील खड्ड्यांपासून खाचखळगे तातडीने दुरुस्ती

पोलीस आयुक्तालयातील जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिलेली माहिती अशी, ठाणे येथील गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला डोंबिवली येथे राहणारी वैशाली आणि इतर मध्यस्थ हे एका स्त्री किंवा पुरुष जातीच्या लहान बाळाची कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता विक्री व्यवहार करणार आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी एक विशेष पथक तयार करून विक्री व्यवहार करणाऱ्यांना सापळ्यात अडकविण्याची व्यूहरचना आखली. पोलिसांनी बाळ खरेदीसाठी एक बनावट ग्राहक तयार केला. या ग्राहकाच्या माध्यमातून पोलीस मध्यस्थ महिलेच्या संपर्कात गेले. मध्यस्थ महिलेने आपल्याकडे स्त्री जातीचे ४२ दिवसांचे बालक असल्याचे बनावट ग्राहकाला सांगितले. ही बालिका पाहिजे असेल तर आपणास चार लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. विक्री व्यवहारातील बालक आम्ही कल्याण पश्चिमेतील रामदेव हाॅटेलजवळ सहजानंद चौक भागात घेऊन येणार आहोत. प्रथम तुम्ही बालिकेला पहा मग पैसे घेऊन या, असा निरोप मध्यस्थ महिलेने बनावट ग्राहकाला दिला. मध्यस्थ महिला सहजानंद चौक येथे मंगळवारी येणार आहे समजल्यावर पथकाने त्या भागात सापळा लावला.

मध्यस्थ महिलेसह गुन्हा दाखल चारही व्यक्ती बनावट ग्राहकाला लहान बालिका दाखविणे आणि विक्री व्यवहार करत असताना सापळा लावून असलेल्या पथकाने मध्यस्थ महिलेसह इतरांवर झडप घातली आणि त्यांना अटक केली. जागरूक तक्रारदारांच्या पुढाकारामुळे बालिकेचा विक्री व्यवहार उघड झाला. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेमधील मुलांची काळजी व संरक्षण कायद्याने चारही जणांवर गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीत प्रचार टिपेला, मजुरीचे दर शिगेला; प्रचारासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर २५० ते १२०० रूपये

मागतेकरी महिला रेखा सोनावणे हिच्या दीड महिन्याच्या बालिकेचा विक्री व्यवहार चार जण करत होते. या महिलेला पाच वर्षांचा मुलगा, सात आणि नऊ वर्षांच्या मुली असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने ही बाळे ताब्यात घेतली. त्यांच्या सुरक्षा आणि देखरेखीसाठी पाच वर्षांच्या मुलाला डोंबिवली एमआयडीसीतील जननी आशीष बालगृह, दोन बहिणींना अंबरनाथ येथील नीला बालसदन येथे ठेवण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, उपनिरीक्षक स्नेहल शिंदे यांच्या पथकाने पार पाडली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four people from dombivli arrested for selling girl in kalyan ssb