लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण पूर्वेत जिम्मीबाग भागात राहत असलेल्या एका ४७ वर्षाच्या महिलेसह इतर तीन जणांची दोन भामट्यांनी आम्ही तुम्हाला मंत्रालयात शिपाई म्हणून नोकरीला लावतो, असे सांगून त्यांच्याकडून गेल्या चार वर्षाच्या काळात चाळीस लाख रूपये उकळले. पैसे देऊन चार वर्ष झाले तरी नोकरी नाहीच, पण दिलेले पैसेही परत मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या नागरिकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

मुक्ता लक्ष्मण चांदेलकर (४७), मनोज यशवं देवळेकर, प्रशांत संभाजी चांदेलकर, उमेश विरजी वेगडा असे फसवणूक झालेल्या तक्रारदारांची नावे आहेत. तक्रारदार मुक्ता चांदेलकर कल्याण पूर्वेतील जिम्मीबाग भागात राहतात. त्या झेरॉक्स आणि टंकलेखन केंद्र चालवितात. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून त्या कुटुंबीयांची उपजीविका करतात. घनश्याम हिरामण धडे, जयवंत पष्टे आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा-डास निर्मिती प्रतिबंधक उपाययोजनांची टाळाटाळ, डोंबिवलीतील अकरा विकासकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नोटिसा

पोलिसांनी सांगितले, आरोपी घनश्याम धडे याने आपली मंत्रालयात ओळख आहे. आपण अनेकांना मंत्रालयात नोकरीला लावले आहे, असे तक्रारदार मुक्ता चांदेलकर यांच्यासह तीन जणांना चार वर्षापूर्वी सांगितले. या बदल्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना, मध्यस्थांना पैसे द्यावे लागतील, असेही त्याने सांगितले. मुक्ता यांच्यासह इतरांनी पैसे भरून नोकरीमिळविण्याची तयारी केली.

मागील चार वर्षाच्या काळात धडे आणि पष्टे यांनी मुक्ता यांच्याकडून ११ लाख ६५ हजार, मनोज देवळेकर यांच्याकडून १८ लाख १२ हजार, प्रशांत यांच्याकडून पाच लाख सहा हजार, उमेश यांच्याकडून चार लाख ८८ हजार रूपये उकळले. अशाप्रकारे चार जणांकडून आरोपींनी ३९ लाख ७९ हजार रूपये वसूल केले.

आणखी वाचा- अंबरनाथ : वालधुनी किनारचे जुने भव्य वृक्ष कोसळले

पैसे घेतल्यानतर तक्रारदार आरोपींकडे नियुक्तीचे पत्र देण्याची मागणी करू लागले. आरोपी त्यांना साहेब बाहेर आहेत. ते सुट्टीवर आहेत, अशी खोटी कारणे देऊन वेळकाढूपणा करू लागले. अशी कारणे देत आरोपींनी चार वर्ष लोटली. आम्हाला नोकरी मिळणार नसेल तर आमचे पैसे परत करा, असा तगादा तक्रारदारांनी लावला. त्यानंतर आरोपींनी तक्रारदारांच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. आरोपींनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ते कोठेच आढळून आले नाहीत. आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर मुक्ता चांदेलकर यांच्या पुढाकाराने तक्रारदारांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.