कल्याण – वीज देयक थकित असल्याने घराचा वीज पुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांनी बंद केला होता. तरीही घरात चोरून वीज पुरवठा घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भिवंडी तालुक्यातील कुंदे गावातील एका वीज ग्राहकावर महावितरणच्या पथकाकडून कारवाई केली जात होती. यावेळी गावातील चार जणांनी पथकाला शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात महावितरण कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारहाण प्रकरणातील कुंदे गावातील दिनेश नामदेव होगे, नरेश आगिवले, तुकाराम आगिवले, शरद पाटील या चार जणांना अटक केली.

महावितरणच्या वाडा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता उद्देश बेलसरे, सुरक्षा पथक भिवंडी जवळील कुंदे गावात वीज ग्राहकांकडून थकित देयकाची वसुली आणि वीज चोरीचा शोध घेत होते. ही तपासणी मोहीम सुरू असताना कुंदे गावातील दिनेश होगे यांची वीज थकबाकी शिल्लक असल्याने त्यांच्या घराचा वीज मीटर यापूर्वीच महावितरण कर्मचाऱ्यांनी काढून नेला होता. तरीही त्यांच्या घरात वीजेचा चोरटा वीज पुरवठा सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. हा चोरीचा वीज पुरवठा खंडित करून कारवाई पथक अन्य ठिकाणी जात होते. त्यावेळी दिनेश होगे यांच्यासह नरेश, तुकाराम, शरद पाटील यांनी पथकाला शिवीगाळ सुरू केली. जनमित्र महेश राजपूत यांच्या हातामधील मोबाईल हिसकावून घेऊन त्यांना मारहाण करण्यात आली.

या घटनेसंदर्भात उपकार्यकारी अभियंता कटकवार यांनी तातडीने गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी विद्युत नियम कायद्याने गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली. ही घटना घडुनही महावितरण पथकाने कुंदे गावातील १५ वीज चोरांविरुध्द कारवाई केली. वीज देयक थकबाकी भरणा करा अन्यथा वीज पुरवठा खंडितच्या कारवाईला सामोरे जा, असे पर्याय थकबाकीदारांसमोर ठेवण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader