कंपनीतील आपला फर्निचरचा ठेका बंद करुन तो दुसऱ्याला दिला, या रागातून ठेकेदाराने दिलेल्या सुपारीवरुन दोन जणांनी येथील एमआयडीसीतील एका कंपनीच्या व्यवस्थापकावर हल्ला केला होता. या प्रकरणात कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने ठेकेदारासह दोन हल्लेखोरांना डोंबिवली जवळील गावांमधून शनिवारी अटक केली.
हेही वाचा >>>ठाणे: इंधन दरवाढ आणि कच्चा मालाच्या किंमतीमुळे धुलिवंदनचा रंग फिका; रंग, पिचकारीच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ
पंकज प्रल्हाद पाटील (३१, ठेकेदार रा. सोनारपाडा), शैलेश रावसाहेब राठोड (३०, रा. देशमुख होम्स, टाटा नाका, डोंबिवली), सुशांत लक्ष्मण जगताप (२७, रा. दिलीप सदन, दत्तमंदिरा जवळ, कोळसेवाडी, कल्याण), महेश शामराव कांबळे (३१, ठाकूर काॅम्पलेक्स, सोनारपाडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार सुरेंद्र मौर्या (४१) डोंबिवली एमआयडीसीतील बीईडब्ल्यू कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. गेल्या महिन्यात संध्याकाळच्या वेळेत कार्यालयीन वेळ संपल्यावर ते दुचाकीने घरी जात होते. एमआयडीसीतील म्हात्रेनगर येथे आल्यावर मौर्या यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन दोन जण आले. त्यांनी मौर्या यांची दुचाकी थांबवली. त्यांना लोखंडी गजाने मारहाण करुन गंभीररित्या जखमी करुन मारेकरी पळून गेले होते. मानपाडा पोलीस ठाण्यात मौर्या यांनी तक्रार केली होती.
हेही वाचा >>>ठाणे: मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणातील संशयितांच्या घराबाहेर अविनाश जाधव कार्यकर्त्यांसह धडकले
कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. गुन्हे शाखेतील हवालदार गुरुनाथ जरग, विश्वास माने यांनी मौर्या यांच्यावर हल्ला झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यांना दोन इसम या भागात घुटमळत असल्याचे दिसले. त्याचा माग सीसीटीव्ही चित्रण, तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने काढला. आरोपी डोंबिवली जवळील २७ गाव भागात असल्याची गुप्त माहिती जरग, माने यांना मिळाली.
वरिष्ठ निरीक्षक शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर, साहाय्यक उपनिरीक्षक संजय माळी, हवालदार गुरुनाथ जरग, बालाजी शिंदे, विश्वास माने, प्रशांत वानखेडे, अनुप कामत, बापूराव जाधव, प्रकाश इदे, किशोर पाटील, सचिन वानखेडे, मिथून राठोड, एम. एस. बोरकर यांनी २७ गावातील सोनारपाडा, टाटा नाका भागात पाळत ठेवली. या भागातून मुख्य आरोपींना अटक केली.
हेही वाचा >>>कळवा रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता निलंबित; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्तांची कारवाई
मौर्या यांच्या कंपनीत आरोपी पंकज पाटील याचे फर्निचर पुरवठ्याचे काम होते. हे काम काढून मौर्या यांनी दुसऱ्या ठेकेदाराला दिले होते. त्याचा राग पंकज यांच्या मनात होता. हा राग मनात ठेऊन पंकज, शैलेश राठोड यांनी मौर्या यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. सुशांत जाधव, महेश कांबळे यांना मौर्या यांच्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली.
चारही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. पंकजवर मानपाडा, नारपोली पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. सुशांतवर नारपोली, मानपाडा, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पाच, शैलेशवर नारपोली, मानपाडा येथे चार, महेशवर धारावी, नागपाडा पोलीस ठाण्यात दोन गु्न्हे दाखल आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरसाठ यांनी दिली.