कल्याण- इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत येथील पूर्व भागातील चार तरुणांनी एका १५ वर्षाच्या तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिसांनी चारही तरुणांना अटक केली. यामध्ये एका अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे.साहिल राजभर, सुजल गवळी, विजय बेरा आणि अन्य एका अल्पवयीन मुलगा अशी आरोपींची नावे आहेत. अल्पवयीन मुलाची रवानगी भिवंडीच्या बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, पीडित तरुणीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आरोपी तरुणांबरोबर ओळख झाली होती. ती त्यांच्या संपर्कात होती. एका तरुणाने पीडितेला माझे माझ्या प्रेयसीसोबत भांडण झाले आहे. याविषयी मध्यस्थी करण्यासाठी तू ये, सांगून तिला भेटण्यासाठी बोलविले. तरुणाने तिला एका खोलीवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात आणखी तीन तरुण सहभागी झाले. या चौघांनी आळीपाळीने तरुणीवर बलात्कार केला.
मुलगी घरी आली नाही म्हणून पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करुन तांत्रिक माहितीच्या आधारे पीडितेची चार जणांच्या तावडीतून सुटका केली. घडला प्रकार पीडितेने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चारही तरुणांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय घोडे तपास करत आहेत.