‘जनतेच्या कामात स्वत:ला विसरणारा’ अशी ठाणे पोलीस दलाची ओळख निर्माण करण्याचे ध्येय विद्यमान पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे, मात्र ठाणे गुन्हे अन्वेषण विभागातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक केल्याने गेली अनेक वर्षे केवळ नावापुरत्या उरलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यपद्धतीविषयी नवे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
रसायन निर्मिती करणाऱ्या एका कंपनीच्या मालकाला कारवाईची भीती दाखवून त्याच्याकडून लाच घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकास अटक झाल्याने हा संपूर्ण विभागच चौकशीच्या फे ऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ठाणे शहरात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरी, घरफोडय़ा आणि फसवणुकीसारख्या गुन्ह्य़ांमध्ये मोठी वाढ होत आहे. सोनसाखळी चोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे महिला, गृहिणींमध्ये काहीसे दहशतीचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या घरफोडय़ांची संख्याही वाढली आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी या गुन्ह्य़ांना पायबंद घालण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, रघुवंशी यांची बदली होताच पुन्हा एकदा या चोरांनी शहरभर उपद्रव सुरूकेला. मात्र पोलिसांच्या हाती अद्याप काहीही लागलेले नाही. स्थानिक पोलिसाबरोबरच अशा गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी आयुक्तालयात गुन्हे शाखेची स्वतंत्र युनिटे कार्यरत आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात वागळे परिसरासाठी असलेल्या गुन्हे शाखेच्या वागळे युनिटची कामगिरी सुमारच राहिलेली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील गुन्ह्य़ांचा छडा लावण्यात काही महिन्यांपासून क्राईम ब्रँचची कामगिरी तशी सुमारच राहिली आहे. या विभागातील काही बडे अधिकारी स्थानिक राजकारण्यांच्या मागे-पुढे राहण्यात धन्यता मानत असल्याची चर्चा आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे कार्यक्षेत्र नसलेल्या वाडा परिसरातील एका केमिकल कंपनीवर या युनिटच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत पोलीस हवालदार प्रेमसिंग राजपूत आणि सुरेश पाटील या दोघांनी कंपनीत रॉकेल आणि फिनेलची भेसळ होत असल्याच्या आरोपावरून चारचाकी वाहन आणि दोन मजुरांना ताब्यात घेतले.
भेसळीचे वाहन सोडविण्यासाठी आणि मजुरांवरील कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव यांनी तक्रारदारकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ५० हजारांची रक्कम कबूल करण्यात आली. ही रक्कम स्वीकारताना हे लाचप्रताप उघड झाले. ठाणे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. एकीकडे अशा स्वरूपाचे ध्येय आखले जात असताना ठाण्यातील क्राइम ब्रँचची कामगिरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा