ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १४ पैकी ४ अत्याधुनिक शस्त्रक्रीया विभाग बंदावस्थेत आहेत. जुन्या वातानुकूलीत यंत्रणेत सातत्याने बिघाड होत असल्यामुळे हा विभाग बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे शस्त्रक्रीया रखडल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान, शस्त्रक्रीया विभागातील वातानुकूलीत यंत्रणा बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरात लवकर हे काम उरकून हा विभाग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा >>> ठाण्यात राष्ट्रवादीचे नवे कार्यालय; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात पाचशे खाटांचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. तसेच या रुग्णालयात राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आहे. या रुग्णालयात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्ण संख्येच्या तुलनेत रुग्णालय अपुरे पडू लागले असून यामुळे रुग्णांना इतरत्र उपचारासाठी जावे लागत आहे. रुग्णालयातील सेवासुविधेविषयी पुर्वीपासूनच तक्रारी आहेत. त्यातच आता शस्त्रक्रीया विभाग बंद झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

कळवा रुग्णालयात १४ अत्याधुनिक शस्त्रक्रीया विभाग आहेत. त्यापैकी चार शस्त्रक्रीया विभागात जुनी वातानुकूलीत यंत्रणा आहे. या यंत्रणेत सातत्याने तांत्रिक बिघाड होऊन ती बंद पडत आहे. यामुळे हे चारही शस्त्रक्रीया विभाग गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामध्ये अपघात विभागातील शस्त्रक्रीया विभागाचा समावेश आहे. येथील रुग्णांना शस्त्रक्रीयेसाठी रुग्णालयातील दुसऱ्या शस्त्रक्रीया विभागात न्यावे लागत आहे. तर, उर्वरीत तीन शस्त्रक्रीया विभाग बंद असल्याने रुग्णांंच्या शस्त्रक्रीया रखडल्या असून यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. शस्त्रक्रीयेसाठी तारखा मिळत नसल्याने रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>> कोपर पूर्व भागात नाल्यातील मलपाणी रस्त्यावर, दुर्गंधीने रहिवासी हैराण

दहा वर्षानंतर विभाग सुरू ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ४० खाटांचा अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आहे. त्यापैकी २० खाटा २०१३ मध्ये रुग्ण उपचारासाठी सुरू करण्यात आल्या असून त्याठिकाणी रुग्ण उपचारासाठी प्रत्यक्षात एकच इन्टेसिव्हीस्ट कार्यरत आहे. तसेच कळवा रुग्णालयातील चार निवासी डॉक्टर, इतर विभागाचे प्रमुख तज्ञ डॉक्टर हे अतिदक्षता विभागातील रुग्णांवर उपचार करतात. परंतु इन्टेसिव्हीस्ट पदाच्या ११ जागा रिक्त असल्याने उर्वरित २० खाटांचा अतिदक्षता विभाग गेल्या दहा वर्षांपासून धुळखात पडला आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. हि बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने इन्टेसिव्हीस्ट पदाच्या ११ रिक्त जागा भरण्याची प्रक्रीया सुरू केली होती. त्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या नुकत्यात मुलाखती घेण्यात आल्या होत्या. ११ पदांसाठी अवघे ६ जण हजर राहिले होते. त्यातील दोन जण पात्र ठरले आहेत. पैकी एकजण रुग्णालयात रूजू झाले आहेत तर, दुसरे डाॅक्टर लवकरच रुजू होणार आहेत. यामुळे गेल्या दहा वर्षांपासून धुळखात पडलेल्या अतिदक्षता विभागातील २० खाटा अखेर रुग्ण उपचाराच्या सुविधेसाठी नुकत्याच उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Story img Loader