ठाणे : मध्य रेल्वे स्थानकातील प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असताना चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. ठाणे ते दिवा आणि ऐरोली ते दिघा या रेल्वे स्थानकांमध्ये मागील तीन वर्षांत ३ हजार ८७३ मोबाईल चोरीला गेले आहेत. याची सरासरी केल्यास तीन ते चार मोबाईची दिवसाला चोरी होत आहे. तर १ हजार ४९४ प्रकरणांचा उलगडा करणे पोलिसांना शक्य झाले आहे. स्थानक परिसरातील चोरट्यांचा सुळसुळाट आणि प्रवाशांचा निष्काळजीपणा यामुळे मोबाईल चोरीच्या घटना समोर येत आहेत.
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात मध्य रेल्वेचे ठाणे ते दिवा रेल्वे स्थानक आणि ट्रान्सहार्बर मार्गिकेचे ऐरोली ते दिघा हे रेल्वे स्थानक येतात. या रेल्वे स्थानकांमध्ये १ जानेवारी २०२२ ते १९ डिसेंबर २०२४ या कालावधीत ३ हजार ८७३ चोरीची प्रकरणे समोर आली आहे. या प्रकरणाची सरसरी काढल्यास दररोज सरासरी तीन ते चार मोबाईलची चोरी होत आहे. रेल्वे डब्यात, फलाटावर प्रवाशांच्या नकळत त्यांच्या खिशातून मोबाईल चोरीला जातात. तर काही प्रकरणांमध्ये प्रवाशांकडून मेल एक्स्प्रेस रेल्वेगाड्या, स्थानक परिसरातील प्रतिक्षालयात मोबाईल चार्जिंगला ठेवून प्रवासी झोपी जातात. त्या कालावधीत चोरट्यांकडून मोबाईल चोरी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील तीन वर्षांपैकी २०२२ मध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत १ हजार ४९७ मोबाईल चोरीच्या घटना घडल्या. तर ५५० प्रकरणे उघडकीस आले. याच कालावधीत २०२३ मध्ये १ हजार २६६ मोबाईल चोरीला गेले. तर ५१८ प्रकरणे उघडकीस आणण्यास पोलिसांना शक्य झाले. २०२४ मध्ये १ जानेवारी ते १९ डिसेंबर या कालावधीत १ हजार ११३ मोबाईल चोरीच्या घटना घडल्या. तर ४२६ प्रकरणे उघडकीस आले.
चोरीच्या घटना घडत असल्या तरी याप्रकरणांचा तपास करून चोरीच्या मोबाईलचा पोलीस शोध घेतात. अनेकदा प्रवाशांच्या खिशातील किंवा रेल्वे डब्यात चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरीला जातात. त्यामुळे चोरीची घटना टाळण्यासाठी प्रवास करताना निष्काळजीपणा टाळायला हवा.- अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग पोलीस.