डोंबिवलीत इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने ग्राहकांची गैरसोय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवलीतील भारत संचार निगमच्या कार्यालयांनी महावितरणची मागील चार महिन्यांची वीज देयकाची १५ लाख ६० हजार रुपयांची रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे महावितरणने निगमच्या डोंबिवलीतील चारही केंद्रांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ‘बीएसएनएल’ची सर्व कार्यालये अंधारात आहेत. निगमच्या या भोंगळ कारभाराचा फटका दूरध्वनी, इंटरनेट सेवेला बसला आहे. गेल्या आठवडय़ापासून विविध भागांतील तीन ते चार हजार दूरध्वनी, इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे.

जनरेटर लावून निगमचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा पुरवठा अर्धा ते एक तास राहत आहे. या कालावधीत ग्राहकांचे दूरध्वनी फक्त खणखणतात व पुन्हा बंद होतात. आर्थिक वर्षांची अखेर सुरू झाली आहे. बहुतांशी कार्यालयांमधील व्यवहार दूरध्वनी, इंटरनेट सेवेवर अवलंबून आहेत.

अनेक कार्यालयांत वेगवान सेवा मिळते म्हणून ‘बीएसएनएल’ची इंटरनेट आहेत. त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. टिळकनगर दूरध्वनी कार्यालयातील कर्मचारी कार्यालयात वीज नसल्याने बाहेरील बाकडा, खुच्र्यावर बसलेले असतात. अशीच परिस्थिती अन्य कार्यालयांमध्ये आहे. टिळकनगर दूरध्वनी कार्यालयाचे तीन लाख वीज देयक थकीत असल्याचे तेथील एका कर्मचाऱ्याने खासगीत सांगितले.

वीज देयके थकविली

वीज देयक भरणा करणे हे निगमच्या कल्याण मुख्यालयाचे काम आहे. त्यामुळे तुम्ही दूरध्वनी कधी सुरू होणार, देयक कधी भरणा करणार हे तिकडेच विचारा, असे निगम कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. डोंबिवलीतील टिळकनगर, स्टार कॉलनी, मानपाडा, एमआयडीसी, आनंदनगर, कोपर या निगम कार्यालयांनी महावितरणची १५ लाख ६० लाख रुपयांची वीज देयकाची रक्कम थकविली आहे. वारंवार नोटिसा बजावूनही निगमने देयक भरणा न केल्याने वीज खंडित करण्याची कारवाई करण्यात आली, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी सांगितले. यापूर्वी बीएसएनएलकडून ग्राहकांना दूरध्वनी, इंटरनेट सेवा का बंद आहे याचे भ्रमणध्वनीवर लघुसंदेश येत असत. गेल्या आठवडय़ापासून एकही संदेश निगमकडून आलेला नाही, असे एका ग्राहकाने सांगितले. अधिक माहितीसाठी डोंबिवलीतील ‘बीएसएनएल’चे विभागीय अभियंता चौधरी यांच्या भ्रमणध्वनी, दूरध्वनीवर सतत संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.