महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असतानाच, गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात रहिवाशांच्या दुचाकी रात्रीच्या वेळेत चोरुन नेण्याचे प्रकार वाढले आहेत. गुरुवारी रात्रीच्या वेळेत चार दुचाकी विविध भागातून चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत.
हेही वाचा- डोंबिवलीतील बालभवनमधील गुलाब पुष्प प्रदर्शनाला प्रारंभ; एक हजाराहून अधिक गुलाब पुष्पे प्रदर्शनात
डोंबिवली पू्र्वेतील पेंडसेनगरमध्ये आनंद दीप सोसायटीत दिलीप मराठे हे सेवानिवृत्त अधिकारी राहतात. त्यांनी नेहमीप्रमाणे आपले दुचाकी वाहन आनंद दीप सोसायटी समोर सार्वजनिक रस्त्याच्या कडेला उभे करुन ठेवले होते. चोरट्याने पाळत ठेऊन दिलीप मराठे यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरुन नेली. रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. कचोरे रोड कल्याण पूर्व भागात रिजवान खान यांनी आपल्या अफसाना टेलर दुकानासमोर दुचाकी वाहन उभे करुन ठेवले होते. रात्रीच्या वेळेत चोरट्याने ही दुचाकी चोरुन नेली. टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.
हेही वाचा- ठाणे: गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सराफा दुकानात पोलीस अधिकाऱ्याची कर्मचाऱ्याला मारहाण
शहाड रेल्वे स्थानका जवळील जय सदगुरू सोसायटीमध्ये गणेश गोसावी, प्राची भोईर ही कुटुंब राहतात. गोसावी, भोईर यांच्या दुचाकी आहेत. ते नेहमीप्रमाणे सोसायटीच्या आवारात आपल्या जागी दुचाकी उभ्या करुन ठेवतात. गुरुवारी रात्री सोसायटीच्या आवारात दुचाकी उभ्या करुन ठेवल्या असता कोणीतरी अज्ञात इसमाने गोसावी, भोईर यांच्या दुचाकी चोरुन नेल्या आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गोसावी यांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
हेही वाचा- ठाणे: नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री नको; जिल्हा प्रशासनाचे आदेश
दुचाकी वाहने चोरुन ती कमी किमतीत ग्रामीण भागात नेऊन विकायची. किंवा या वाहनांचे वाहन क्रमांक बदलून ही वाहने अन्य राज्यात विक्रीला न्यायची असे प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. दुचाकी जुनी असेल तर ते वाहन भंगार विक्रेत्याला विकले जाते, असे एका माहितगाराने सांगितले.