बदलापूर : मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांमधील पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करण्याचे काम राज्य सरकारकडून वेगाने सुरू असल्याने चौथी मुंबई अशी ओळख मिरविणारी ही शहरे भविष्यातील विकासाचे केंद्र ठरेल असा विश्वास अंबरनाथ-बदलापूर मालमत्ता प्रदर्शनाच्या निमित्ताने उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.
‘नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’ अर्थात ‘नारडेको’च्या माध्यमातून ‘बदलापूर अंबरनाथ बिल्डर्स असोसिएशन’तर्फे गृह प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन १४ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत आयोजित केले आहे. काटई-कर्जत राज्यमार्गावर कारमेल शाळेजवळील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानातील हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनात ४२ विकासकांचे २०० गृह प्रकल्प मांडण्यात आले आहेत. या गृह प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार किसन कथोरे, आमदार बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष राम पातकर, अरिवद वाळेकर, सुनील चौधरी, वामन म्हात्रे, बदलापूर अंबरनाथ बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय ठाणेकर, राजेंद्र घोरपडे, प्रांत जयराज कारभारी, मुख्याधिकारी योगेश गोडसे, उपाध्यक्ष एच. आर. पटेल, विकासक समितीचे संजय जाधव उपस्थित होते.
शहरात पायाभूत सुविधांचा विकास होऊ लागला की चांगले विकासक शहरात येतात. चांगल्या विकासकांमुळे दर्जेदार घरांची उभारणी होते. दर्जेदार घरांमुळे चांगला रहिवासी वर्ग शहरात येतो. अंबरनाथ, बदलापूर शहरांचा विकास हा अशा पद्धतीने होत आहे, असा दावा या वेळी खासदार शिंदे यांनी केला.
अंबरनाथ, बदलापूरच्या पाणीपुरवठा योजना स्वतंत्र केल्या तर या शहरांना कधी भेडसावणारा पाणी टंचाई प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. या कामासाठी खासदारांनी पुढाकार घ्यावा. विकासाची आदर्शवत प्रतिकृती ही जुळी शहरे राज्याला देत आहेत. त्यामुळे या शहरातील काही नागरी समस्या, विकासकांचे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, असे आमदार किसन कथोरे म्हणाले.
‘आपल्या शहरात काय आहे हे देशाला दाखविण्यासाठी अशा गृह प्रदर्शनांची खूप गरज आहे. अशा प्रदर्शनांमधून ग्राहकांचा लाभ होतोच पण दर्जेदार वर्ग शहरात निवासासाठी येतो. ते शहराचे वैभव असते. विकासकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य देऊ’, असे प्रांत अधिकारी कारभारी यांनी सांगितले.
नवीन बांधकाम नियमावलीचे लाभ, या भागात होत असलेल्या नागरी सुविधा, त्या अनुषंगाने होत असलेला विकास विचारात घेऊन वार्षिक मूल्यदर वाढले तरी घर खरेदीदारांना त्यांच्या चौकटीप्रमाणे एका छताखाली मनपसंतीचे घर खरेदी करता यावे या उद्देशातून या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, असे अध्यक्ष अजय ठाणेकर यांनी सांगितले.
‘मोठे शिंदे उदार..’
विकासाच्या बाबतीत मोठे शिंदे म्हणजे पालकमंत्री एकनाथ शिंदे कधीही नन्नाचा पाढा वाचत नाहीत. आपल्या मतदारसंघात कधी नव्हे एवढा विकास निधी आपण आताच्या सरकारच्या काळात आणला. मोठे शिंदे विकासकामांमध्ये उदार आहेत. लहान शिंदेचा आम्हाला (खासदार शिंदे) अद्याप अनुभव नाही. त्यांनीपण आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, असा चिमटा आमदार कथोरे यांनी खासदार शिंदे यांना घेतला. आता खासदार, आमदार निधी किंवा इतर प्रश्न सोडविण्यासाठी पहिले आपल्याशी संपर्क साधतात. त्यांची कामे चुटकीसरशी आमच्या नगरविकास बँकेच्या माध्यमातून मार्गी लागतात. त्याप्रमाणे आपणही माझ्याशी संपर्क करा. तुमचेही काम मार्गी लावू, अशी कोपरखळी खासदारांनी कथोरेंना लगावली.
चौथी मुंबई हे विकासाचे केंद्र ठरेल!;मालमत्ता प्रदर्शनात विश्वास व्यक्त
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांमधील पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करण्याचे काम राज्य सरकारकडून वेगाने सुरू असल्याने चौथी मुंबई अशी ओळख मिरविणारी ही शहरे भविष्यातील विकासाचे केंद्र ठरेल असा विश्वास अंबरनाथ-बदलापूर मालमत्ता प्रदर्शनाच्या निमित्ताने उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.
Written by अक्षय येझरकर
First published on: 15-04-2022 at 02:27 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fourth mumbai center development expressed confidence property exhibitions area mumbai metropolitan region authoritywork state government amy