लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: आकर्षक परताव्याचे आमीष दाखवून एका भुरट्या टोळीने ऑनलाईन गुंतवणूक माध्यमातून डोंबिवली शहर परिसरातील ३७ जणांची एकूण ३५ लाख रुपयांची वर्षभराच्या कालावधीत फसवणूक केली आहे. या गुंतवणूकदारांनी एकत्रितपणे मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

२० हजारापासून ते चार लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूक रकमा आहेत. शिळफाटा रस्त्यावरील खोणी पलावा भागात राहणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गु्न्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार महिलेला गेल्या महिन्यात त्यांच्या व्हाट्सअ‍ॅपवर द रोड रिचेस तेरा नावाने एक गुंतवणूक योजनेचा माहिती देणारा लघुसंदेश आला. तेव्हा सदर महिलेने त्या ग्रुपवर प्रतिसाद देताच त्यांना एक महिला आणि काही पुरूष त्यांच्या गुंतवणूक योजनेची माहिती देऊ लागली. अल्पावधीत आकर्षक परतावा मिळत असल्याने या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. २५ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास ग्राहकाला ५० टक्के नफा आणि कंपनीला ३० टक्के सूट परतावा मिळेल असे महिलेला भुरट्यांनी सांगितले.

हेही वाचा… ठेकेदारांच्या मनमानीमुळे कल्याण-डोंबिवली पालिकेत नालेसफाई कामांची नव्याने निविदा प्रक्रिया

सुरुवातीला तसा परतावा देण्यात आला. त्यानंतर आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर भुरट्यांनी महिलेकडून नोंदणी आणि इतर गुंतवणुकीच्या नावाखाली गेल्या महिनाभरात भुरट्यांनी अतिक उर रहमान, राजू देवी, सुशांत निकम, रोहित कुमार, रौनक अन्सारी यांच्या बँक खात्यावर एकूण पाच लाख ३८ हजार रुपयांची रक्कम जमा करून घेतली. अशाच पध्दतीने इतर ३६ गुंतवणूकदारांकडून गेल्या वर्षभराच्या कालावधीत या भुरट्यांनी २९ लाख रुपयांची रक्कम गुंतवणुकीच्या नावाखाली वसूल केली.

हेही वाचा… डोंबिवलीतील ठाकुर्ली, कोपर उड्डाण पुलांवरील पथदिवे बंद

गुंतवणुकीनंतर काही दिवसांनी आकर्षक परतावा नाहीच, पण मूळ रक्कमही परत देण्यास भुरटे टाळाटाळ करू लागले. ग्राहकांच्या मोबाईलला संपर्क देणे त्यांनी बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर ३७ गुंतवणूकदारांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.