शहापूर : आदिवासी-कातकरी समाजातील महिलांचे तात्पुरते बचतगट स्थापन करून त्या महिलांच्या नावावर बँक आणि पतपुरवठा संस्थेमधून कर्ज काढून त्यांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्जाची रक्कम मिळालेली नसतानाही वसुली एजंटचा त्रास सुरू झाल्याने आदिवासी महिला हैराण झाल्या आहेत. या प्रकरणी किन्हवली पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली असून अशाप्रकारे शहापुर तालुक्यातील अनेक महिलांची फसवणूक झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेणवा येथील सविता गणेश वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून किन्हवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणा दत्तात्रेय सिताराम रण आणि त्याची पत्नी गुलाब दत्तात्रेय रण या दाम्पत्याला अटक केली आहे. याप्रकरणात बँकेचे कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का, या दिशेने तपास करण्यात येत आहे. शहापूर तालुक्यातील ठिकठिकाणच्या कातकरीवाडीतील गरीब गरजू आदिवासी महिलांना एका कर्ज प्रकरणी चार ते पाच हजार देऊन त्यांच्या नावावर विविध बँक आणि पतपुरवठा करणाऱ्या संस्थांमधून कर्ज काढण्यासाठी त्यांची कागदपत्रे जमा करण्यात आली. या महिलांच्या अशिक्षीतपणाचा गैरफायदा घेवून त्यांचे तात्पुरते बचत गट स्थापन केले आणि या महिलांच्या नावावर विविध बँक तसेच पतपुरवठा संस्थांमधून ३० ते ७० हजारापर्यंत असे लाखो रुपयांचे कर्ज काढले. महिलांना मिळालेल्या कर्जाची सर्व रक्कम दलाल टोळीने महिलांकडून जमा केली आणि या कर्जाची फेड आम्ही करू असे सर्व महिलांना आश्वासन दिले. कर्जाचे पहिले हप्ते भरले. मात्र दुसऱ्याच महिन्यात हप्ते भरले नाहीत आणि स्वतःचे दूरध्वनी बंद करून उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले. एकीकडे कर्ज देणाऱ्या बँका आणि पतपुरवठा संस्थांच्या वसुली एजंटांचा त्रास तर दुसरीकडे या टोळीची अरेरावी अशा दुहेरी संकटात अडकलेल्या काही आदिवासी महिला भयभीत झाल्या आहेत.

याप्रकरणात दत्तात्रेय रण आणि त्याची पत्नी गुलाब या दाम्पत्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे. तपासानंतरच नेमकी कितीची फसवणुक झाली आहे, हे समजू शकेल, असे शहापुरचे पोलीस उपअधीक्षक मिलींद शिंदे यांनी सांगितले