भिवंडीत बँकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघड
ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ए. एल. जऱ्हाड यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या स्वाक्षरीचे ‘स्कॅनिंग’ करून त्या आधारे बनावट बिगरशेती आदेश तयार करण्याचा प्रताप भिवंडीतील एका प्रकरणात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा आदेश एक मोठय़ा बॅंकेला सादर करून त्यांच्याकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न या प्रकरणातील मंडळींनी केला. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात या कागदपत्रांची पडताळणी सुरू असताना हा गैरप्रकार उघडकीस आला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
भिवंडी-माणकोली येथे राहणारे पंडित श्रीपत केणी यांनी बांधकामाच्या कर्जासाठी नवी मुंबईतील कोपरखरणे येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेकडे अर्ज केला होता. या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये ही जमीन बिगरशेती असल्याचे दाखवणारा दस्तावेज होता. त्यावर ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी ए. एल. जऱ्हाड यांची स्वाक्षरी होती.
नियमित प्रक्रियेनुसार बँकेने ही कागदपत्रे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. तेव्हा कागदपत्रांची पडताळणी करताना बिगरशेती प्रमाणपत्रावर जऱ्हाड यांची स्वाक्षरी संगणकाच्या मदतीने स्कॅन करून चिकटवण्यात आल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, बिगरशेती प्रमाणपत्रावर १९ फेब्रुवारी २०१४ अशी तारीख होती. प्रत्यक्षात या काळात पी. वेलारासू हे जिल्हाधिकारी होते. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.
भिवंडीचे तहसीलदार तसेच अप्पर मंडळ अधिकारी अशोक दुधसागरे, तलाठी सज्जा वेहेळे, संजीव धात्रक यांनी माणकोली गावात जाऊन पाहणी केली असता त्या जमिनीवर आधीच बांधकाम सुरू करण्यात आल्याचे आढळले. त्यानुसार भिवंडी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा