ठाणे : कर्करोगावर उपचार देतो असे सांगून भामट्यांनी ५० हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात ७२ वर्षीय महिला राहतात. त्या कर्करोगग्रस्त आहेत. दररोज सकाळी त्या पायी फिरण्यासाठी जात असतात. काही दिवसांपूर्वी त्यांना एक व्यक्ती भेटला. त्याने महिलेकडे कर्करोगाची विचारणा केली. तसेच त्याच्या ओळखीतील एक डाॅक्टर कर्करोगावर निदान करतो अशी माहिती दिली. त्या व्यक्तीने डाॅक्टरचा मोबाईल क्रमांक दिला. काही दिवसांनी तो डाॅक्टर वारंवार महिलेच्या मुलाला संपर्क साधून उपचाराबाबात विचारणा करू लागला.
२९ ऑक्टोबरला तो त्यांच्या घरी आला. तसेच त्याने महिलेच्या हातावर एक इंजेक्शन टोचले. या उपचारासाठी त्याने मुलाकडून ५० हजार रुपये उपचारासाठी घेतले. दोन दिवसांनी त्यांच्या मुलाने त्या डाॅक्टरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु मोबाईल क्रमांक बंद होता. सकाळी फेरफटका मारणाऱ्या व्यक्तीचा देखील मोबाईल क्रमांक बंद असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरातील एका खासगी रुग्णालयात तपासणी केली असता, त्यांच्यावर झालेले उपचार बोगस असल्याचे समोर आले. याप्रकरणी महिलेच्या मुलाने फसवणूकीची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.