लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील पांडुरंगवाडी भागात राहत असलेल्या एका जवाहिऱ्याला मुंबईतील लालबाग येथील एका इसमाने दोन कोटी ८१ लाखाची वेष्टनात बंदिस्त बनावट सोन्याची नाणी विकली. डोंबिवलीतील जवाहिऱ्याला संशय आल्याने त्याने एक नाणे काढून तपासले असता ते बनावट असल्याचे आढळून आले. ही नाणी बनावट असल्याने आपले पैसे परत करावेत म्हणून जवाहिऱ्याने तगादा लावूनही भुरट्या इसमाने पैसे परत न केल्याने जवाहिऱ्याने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हितेश रमेश गांधी (४३) असे डोंबिवलीतील फसवणूक झालेल्या जवाहिऱ्याचे नाव आहे. ते डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील पांडुरंगवाडी भागात राहतात. त्यांचे डोंबिवलीत सोने, चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे. गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. पमेश सुरेंद्र खिमावत असे फसवणूक करणाऱ्या भुरट्याचे नाव आहे. तो मुंबईतील लालबाग भागातील गणेशगल्ली परिसरात राहतो.

आणखी वाचा-ठाणे : चोरीचा संशय घेतल्याने नातवाकडून आजीची वरवंट्याने ठेचून हत्या

पोलिसांनी सांगितले, जवाहिर हितेश गांधी यांच्या खास परिचयातील रमेश जैन यांनी हितेश यांना गेल्या तीन महिन्यापूर्वी सांगितले, आपल्या ओळखीचा पमेश खिमावत यांच्याकडे सोन्याची नाणी आहेत. ती त्यांना विकायची आहेत. ही सोन्याची नाणी वालकांबी सुईस कंपनीची असल्याचे रमेश जैन यांनी जवाहिर हितेश यांना सांगितले. ओळखीच्या व्यक्तिमार्फत सोन्याची नाणी सहज विकत मिळत आहेत म्हणून हितेश यांनी पमेश खिमावत यांच्याशी व्यवहार करण्याचे ठरविले. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या तीन महिन्याच्या कालावधीत तीन हजार ७०० ग्रॅम वजनाची वालकांबी सुईस कंपनीची वेष्टन बंदिस्त असलेली ३७ नाणी दोन कोटी ८१ लाख १० हजार रूपयांना खरेदी केली. प्रत्येक नाणे १०० ग्रॅम वजनाचे होते.

अलीकडे सोन्याचा भाव वाढल्याने त्यामुळे या नाणे विक्रीतून आपणास अधिकचा आर्थिक लाभ होईल म्हणून हितेश गांधी यांनी रमेश जैन यांच्यामार्फत पमेश खिमावत यांना निरोप देऊन काही सोन्याची नाणी विकण्याची मागणी केली. निरोप मिळताच विक्रेते पमेश खिमावत यांनी असा व्यवहार आपण करत नाही आणि ती सोन्याची नाणी विकू शकत नाही, असा निरोप हितेश यांना दिला. त्यामुळे हितेश गांधी यांच्या मनात संशय आला. त्यांनी सिलबंद असलेले सोन्याचे नाणे बाहेर काढून ते तज्ज्ञ सोने परीक्षकाकडून तपासून घेतले तर ते नाणे बनावट असल्याचे आढळले. हितेश यांनी सर्व नाणी परीक्षकाकडून तपासून घेतली ती सर्व नाणी बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

आणखी वाचा-ठाणे पालिकेची कचरा विल्हेवाटीसाठी पाऊले; भिवंडीतील आतकोलीच्या जागेवर कचऱ्यापासून कोळसा, वीज निर्मीतीचा प्रकल्प

हितेश यांनी ही सर्व बनावट नाणी परत घेऊन आपले घेतलेले सर्व पैसे परत करण्याचा तगादा पमेश खिमावत यांच्यामागे लावला. पमेश यांनी हितेश यांना प्रतिसाद देणे बंद केले. आपला विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याने हितेश यांनी पमेश खिमावत यांच्या विरुध्द पोलिसांत तक्रार केली आहे. पमेश फरार झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याची कागदपत्रे गुन्हे शाखेच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे पाठवली आहेत.