लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली – वाढीव व्याजाचे आमिष दाखवून डोंबिवली, ठाणे, मुंबई परिसरातील गुंतवणूकदारांची चार कोटी ६१ लाखाची फसवणूक करणाऱ्या डोंबिवलीतील मुख्य आरोपीला रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी पुणे येथून अटक केली. या आरोपीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
विनय पुरूषोत्तम वर्टी (६८, रा. निळकंठ सोसायटी, फत्ते अली रोड, डोंबिवली पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. गेल्या जूनमध्ये या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी वर्टी फरार झाले होते.
या प्रकरणात गिता दीपक तळवडेकर (६५, रा. काकड इस्टेट, वरळी, मुंबई.), नारायण गोविंद नाईक (६६, रा. अन्नपूर्णा आशिष इमारत, गुप्ते रस्ता, जयहिंद काॅलनी, डोंबिवली पश्चिम), दिव्य पुस्पराज सिंग (६६, रा. लिला सागर, यारी रस्ता, वर्सोवा, अंधेरी) या आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. रामनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी सांगितले, आरोपी विनय वर्टी यांनी युनिक कन्सलटन्सी ही गुंतवणूकदार कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत इतर तीन आरोपी संचालक होते. या आरोपींनी ठाणे, डोंबिवली, मुंबई, कल्याण परिसरातील १५० हून अधिक नागरिकांना आपल्या युनिक कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. ही गुंतवणूक शेअर बाजारात करून गुंतवणूक रकमेवर १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. याशिवाय एक वर्षात पैसे दुप्पट, सोने देण्याचे आश्वासन दिले.
कमी कालावधीत झटपट दुप्पट रक्कम मिळणार म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या ठेव, निवृत्तीच्या रकमा आरोपी वर्टी यांच्या युनिक कंपनीत ठेवल्या. गुंतवणुकीची मुदत संपल्याने ग्राहकांना रकमेवर वाढीव व्याज, सोने देण्याची मागणी युनिकच्या संचालकांकडे सुरू केली. ते टाळाटाळ, उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. सतत मागणी करूनही आपले वाढीव व्याज, सोने नाहीच पण मूळ रक्कम परत मिळत नसल्याने आपल्या रकमेचा अपहार युनिकच्या संचालकांनी केला आहे. अशी खात्री पटल्यावर डोंबिवलीतील एक गुंतवणूकदार प्रतीक महेंद्र भानुशाली (३५) आणि इतर गुंतवणूकदारांनी एकत्रितपणे रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर हा गुंतवणूक घोटाळा उघडकीला आला.
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपी विनय वर्टी फरार झाले होते. मागील सहा महिन्यांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. ते पुणे येथे वास्तव्याला असल्याची माहिती मिळाल्यावर साहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, गणेश जाधव, हवालदार शरद रायते, पी. के. मोरे यांनी पुणे भागात शोध मोहीम सुरू केली होती. अखेर शुक्रवारी पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रवेशव्दारावर वर्टी यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.